ठाणे : नौपाडा विष्णूनगर येथील छेडा ॲण्ड छेडा रेंटल हाऊसिंग इमारतीच्या १३ मजल्यावर लिफ्टमध्ये १० वर्षीय चिमुरडा अडकून पडला होता. जवळपास अर्ध्या तासाने त्याला बाहेर काढण्यास त्या इमारतीच्या सुरक्षारक्षकांना यश आले. ही घटना बुधवारी सकाळी ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. स्वयम मयुर महाडिक असे त्या चिमुरड्याचे नाव आहे.
स्वयम हा एकटाच लिफ्टमधून जात होता. लिफ्ट १३व्या मजल्यावर जाऊन थांबली आणि तेथेच अडकली. लिफ्ट वर किंवा खाली होत नव्हती आणि त्यातच तिचा दरवाजाही उघडत नव्हता. १५ ते २० मिनिटे लिफ्ट अडकून पडल्याचे लक्षात येताच, सुरक्षारक्षकांनी तातडीने १३व्या मजल्यावर धाव घेतली. याचदरम्यान ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती मिळताच ते पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत त्या चिमुरड्याला इमारतीच्या सुरक्षारक्षकांनी सुखरूप बाहेर काढले होते, अशी माहिती कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.