अंबरनाथ : अंबरनाथ येथील बिगारी काम करणाऱ्या मजुराच्या ४ वर्षीय मुलाचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या खडी मशीन परिसरात आढळून आला . हा चिमुकला आपल्या मित्रासह त्या परिसरात खेळत असताना ग्रिट पावडर त्याच्या अंगावर पडल्याने त्यात त्याच्या गुदमरून मृत्यू झाला.
अंबरनाथ ( प ) येथील बुवापाडा परिसरात, उत्तर भारतीय महिला मंडळ कार्यालयाजवळ एका चाळीत सफिउल्लाजान मोहम्मद शेख ( ३७ ) हा बिगारी काम करणारा मजूर राहतो . त्याचा ४ वर्षीय मुलगा सलाउद्दीन सफीउल्लाजान शेख हा शनिवारी सकाळी शेजारील मुलांसोबत खेळायला गेला होता. सायंकाळपर्यंत तो घरी आला नव्हता. मुलाच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला , आजूबाजूला चौकशी केली मात्र त्याचा पत्ता लागला नाही .
शेवटी अंबरनाथ पोलीस ठाण्यात साफिउल्लाजान शेख यांनी मुलाच्या बेपत्ता विषयी तक्रार नोंदविली होती . या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता . मात्र रविवारी सकाळी सफिउल्लाजान यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या खडीमशीन परिसरात ग्रीडच्या ढिगाऱ्याजवळ सलाउद्दीनचा मृतदेह आढळून आला . पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सलाउद्दीनचा मृतदेह ताब्यात घेतला व उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला .
या खडीमशीन परिसरात हाच मुद्दा खेळत असताना खडीमशीन मधील ग्रिट पावडर जेसीबीने हलविण्यात येत असताना संपूर्ण ग्रिट पावडर याच चिमुकल्याच्या अंगावर पडले ग्रिट पावडर चा प्रमाण जास्त असल्याने त्याला बाहेर पडणे शक्य झाले नाही आणि जेसीबी यंत्र चालवणाऱ्या चालकाला देखील हा चिमुकला ग्रिट पावडर च्या खालची अडकल्याची लागली नाही हा सर्व प्रकार त्याच्यासोबत खेळणाऱ्या त्याच्या मित्राला दिसली होती मात्र भीतीपोटी तो काहीही बोलला नाही. या खडीमशीन परिसरात संरक्षक भिंत नसल्याने थेट प्रवेश लहान मुलांना मिळत असल्याने या परिसरात आधीपासून धोक्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान शविच्छेदनानंतर सलाउद्दीनचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला . आज सायंकाळी सलाउद्दीनचा त्याच्या नातेवाईकांनी अंत्यविधी केला . यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते . या घटनेमुळे बुवापाडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .