ठाणे : कोरोना साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास वर्षभरापासून बंद असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीच्या शाळा कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करून बुधवारपासून सुरू झाल्या. यात शहरी भाग वगळून पहिल्या दिवशी ४२२ शाळा सुरू झाल्या आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ग्रामीण भागातील शाळा २७ जानेवारी सुरू करण्याचे निर्देश दिले होते.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या एक हजार ३४६ शाळा आहेत. या शाळा खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित, जिल्हा परिषद आदी स्वरूपातील व्यवस्थापनाच्या आहेत. बुधवारी पहिल्याच दिवशी ३४५ प्राथमिक शाळा तर ७७ माध्यमिक शाळा सुरू झाल्या. शाळेत प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी मास्क लावल्याची खात्री करण्यात आली. शाळेत सॅनिटायझरची व्यवस्था केली असून विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतर राखून बसविण्यात येत आहे.. शिक्षकांनादेखील खबरदारी म्हणून कोविड चाचणी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले होते. सर्व शाळांनी नियमांचे पालन करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी दिले आहेत.
फुलांचा वर्षाव करून विद्यार्थ्यांचे स्वागत भातसानगर, मुरबाड : ग्रामीण भागातील शाळांमध्ये बुधवारी पुन्हा घंटा वाजली. पहिल्याच दिवशी शाळेचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजून गेला होता. बऱ्याच दिवसांनी मित्रमैत्रिणी भेटल्याने त्यांच्या चहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी शाळांनी फुलांचा वर्षाव करुन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळांमध्ये कोरोनाचे नियम कटाक्षाने पाळले गेले होते. पहिल्याच दिवशी विद्यार्थी मोठ्या संख्येने शाळेत आले होते. शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण सुरु होते. मात्र ग्रामीण भागात काही ठिकाणी तांत्रिक अडचणी जाणवत होत्या. त्यामुळे शाळा सुरु करावी अशी मागणी केली जात होती. म. ना. बरोरा माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची तपासणी व फुलांचा वर्षाव करून वर्गात सोडण्यात येत होते. प्रत्येक वर्गात १५ ते २० विद्यार्थी बसविण्यात आले होते. परिस्थिती पूर्णपणे आवाक्यात आल्यानंतर सर्व शाळा नियमित वेळेनुसार भरवणार असल्याचे शाळा प्रशासनाने म्हटले आहे.
विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटपमुरबाड तालुक्यातील २१० शाळा सुरु झाल्या. या शाळांमधील शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ग्रामपंचायतीने सर्व शाळांमध्ये निर्जंतुकीकरण केले. शाळांनी विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप केल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी शीला लंबाटे यांनी दिली.