मीरारोड - संजय गांधी राष्ट्रीय उद्याना लगत काशीमीरा महामार्ग भागात एक ठिपके वाले चितळ अर्थात स्पॉटेड डिअर आढळून आले. वन विभागाने त्याला पकडून बोरिवली येथे नेले व नंतर त्यास जंगलात सोडून दिले.
घोडबंदर गावातील बराचसा परिसर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या संरक्षित जंगल क्षेत्रात येतो. येथे काही खाजगी जागा असल्या तरी त्यातील काही जागा इको सेन्सेटिव्ह झोन मध्ये येतात. या भागात बिबट्या वाघांचा नेहमीच वावर असतो. त्याच प्रमाणे काही चितळ सुद्धा येथे वास्तव्य करून आहेत. जंगल हद्दीतून बिबटे, चितळ आदी जीवघेणा मुंबई -अहमदाबाद महामार्ग ओलांडून घोडबंदर गाव व परिसरात येत असतात.
रविवारी घोडबंदरच्या पोद्दार इंटरनेशनल शाळे लगत एका निर्माणाधीन बांधकाम प्रकल्पच्या जागेत कुंपणभिंतीच्या आडोशाला ठिपके असलेले चितळ असून भटके श्वान मागे लागले असल्याची माहिती घोडबंदर परिमंडळ अधिकारी मनोज पाटील यांना मिळाली. पाटील यांच्यासह वनरक्षक गोविंदा सावकारे तर बोरिवली राष्ट्रीय उद्यानातील वनरक्षक वैभव पाटील हे त्यांच्या रेस्क्यू पथकासह आले. चितळ हे वेगात पाळणारे व चपळ असले तरी वन विभागाच्या पथकाने त्याला बेशुद्ध न करता जाळ्यात अलगद पकडले . त्याच्या पायाला खरचटले होते . मादी चितळ होते व सुमारे एक ते दिड वर्ष वयाचे असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
चितळला बोरिवली राष्ट्रीय उद्यानात नेऊन त्याच्यावर उपचार केले व त्याला पाणी पाजण्यात येऊन नंतर जंगलात सोडून देण्यात आले . कुत्रे मागे लागल्याने त्याच्या पायाला खरचटले असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली . चार दिवसां पूर्वी हे चितळ घोडबंदर गावा लगत दिसले होते . तेथून त्यास जंगलात घालवले होते . त्याच्या सोबत आणखी काही चितळ असल्याचं माहिती त्या अधिकाऱ्याने दिली . हे चितळ बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.