वाडा : वाडा वनविभागाने खंडेश्वरी वनोपज तपासणी नाक्यावर मिळालेल्या गुप्त माहिती नुसार एका टेम्पोची तपासणी केली असता त्यात खैराची ३९ चोरटी लाकडे आढळून आली. ती करणाऱ्या दोघांंना अटक करण्यात आली असून वाहनासह पाच लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. वनविभागाचे पश्चिम वाड्याचे वनक्षेत्रपाल टी. एल. लंगडे व पूर्व वाड्याचे डी. सी. पवार यांना एम. एच. ०४ ईएल ३८८० या क्रमांकाच्या टेम्पोतून लाकडाची चोरटी वाहतूक केली जाणार असल्याची खबर मिळाली होती. त्या नुसार वनपाल किशोर पाटील, अजय चव्हाण, उत्तम पाटील व नाकेदार अनिल धारावणे, अशोक पाटील, सागर देशमुख, वनरक्षक एम. बी. दुपारे, वाहनचालक मुरलीधर बोडके व गिरीश सांबरे या पथकाने सोमवारी रात्री खंडेश्वरी नाका वनोपज तपासणी नाक्यावर बॅरिकेड्स लाऊन नाकाबंदी केली. वाहनांची तपासणी सुरू केली. यावेळी विक्रमगड येथून भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला थांबण्याचा इशारा केला असता त्याने चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या गाडीला चपळाईने अडवून तिची तपासणी केली असता त्यात खैराचे ३९ नग आढळून आले. सर्व गदारोळात गर्दीचा व अंधाराचा फायदा घेऊन एक आरोपी फरार झाला मात्र अब्दुल रहीम अन्सारी व चालक संदीप मारोती सागर रा. भिवंडी यांना अटक करण्यात आली आहे. टेम्पोत २६१४ घनमीटर खैराचे नग असून त्यांची बाजारात किंमत एक लाखाच्या आसपास आहे, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. तर टेम्पोची किंमत चार लाख आहे. हा सर्व ऐवज जप्त केला असून ही जंगलतोड विक्र मगडमध्ये निष्पन्न झाले आहे. या बाबत पुढील तपास वाडा वनविभाग करीत आहेत. (वार्ताहर)
चोरट्या खैरासह टेम्पो पकडला
By admin | Published: May 11, 2016 1:41 AM