ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ठाणे शहरात प्रथमच चोर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या चोरहंडीचा थरार ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते १० वाजेदरम्यान अष्टविनायक चौकात रंगणार आहे.
गोकुळष्टमीच्या दिवशी उंच थरांच्या दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई, ठाण्यात गोविंदा पथके महिनाभर सराव करत असतात. या पूर्वतयारीची रंगीत तालीम म्हणून चोर दहिहंडीकडे पहिले जाते. मुंबईच्या माझगाव, गिरणगावात चोर दहीहंडी उभारण्याची मागील चार दशकांची परंपरा आहे. मात्र ठाण्यात चोर दहीहंडी उभारली जात नव्हती. त्यामुळे ठाण्यातील गोविंदा पथकांना तशी संधी मिळावी म्हणून चोर दहीहंडी आयोजित केली आहे. ठाणे पूर्वभागातील मनसेचे शाखाध्यक्ष विनायक बिटला यांनी याचे आयोजन करताना चोर दहीहंडीला अनेक वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले.
या चोर दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांना त्यांच्या कामगिरीनुसार रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे. दहीहंडी दरम्यान सुमारे ७५ हजारांहून अधिक रकमेची बक्षिसे वितरित केली जाणार आहेत. सहभागी गोविंदा पथकांना प्रोत्साहित करण्यासाठी ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष आणि मनसे नेते अविनाश जाधव, मनसे नेते अभिजित पानसे, ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे आणि जय जवान गोविंदा पथकाचे प्रमुख संदीप ढवळे उपस्थित राहणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे.