ठाणे: जमावाच्या मारहाणीत शत्रुघ्न यादव (२२) या चोरटयाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली असली तरी आणखी तीन ते चार जणांचा शोध घेण्यात येत आहे. यासाठी प्रत्यक्ष साक्षीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सोमवारी (२० नोव्हेंबर रोजी) पहाटे २ वाजण्याच्या सुमारास शत्रुघ्नला रंगेहाथ पकडल्यानंतर त्याला राजेंद्र यादवसह अनेकांनी बेदम चोप दिला. पहाटे २ ते ६ वाजण्याच्या दरम्यान त्या परिसरात ज्याला समजेल त्याने त्याची यथेच्छ धुलाई केली. याच दरम्यान, त्याला बांधून उलटे टांगण्यात आले. त्याानंतर बांबूने आणि लाथाबुक्यांनी ब-याच जणांनी त्याच्यावर हात साफ केला. जवळपास दोन ते तीन तास त्याची यथेच्छ धुलाई केल्यानंतर त्याची हालचाल बंद झाल्यावर सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यापैकी एकाने पोलिसांना ही माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण, फोन न लागल्यामुळे पुन्हा त्याला मारहाण केली. अखेर सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुन्हा कळवा पोलिसांना कळविल्यानंतर त्याला ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्या घरात त्याने शिरुन चोरीचा प्रयत्न केला, त्या घरातील राजेंद्र यादव त्याचे वडील गगनप्रसाद यादव बाजूच्या घरातील पंचलाल यादव आणि जयहिंद उपाध्याय या चौघांना पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. यात आणखी किमान सात ते आठ जण असण्याची शक्यता असून त्यातील दोघांची नावे तपासात समोर आली आहेत. त्यांनाही लवकरच ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. नेमकी मारेकरी मिळण्यासाठी अनेक साक्षीदार तपासले जात असून पुरावेही गोळा करण्याचे काम सुरु असल्याचे एका वरीष्ठ पोलीस अधिका-याने ‘लोकमत’ ला सांगितले.