भार्इंदर/मीरा रोड : महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ६७७ जणांपैकी दोन बाद अर्जांसह ६३ अर्ज अवैध ठरले, तर ९८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने एकूण २४ प्रभागांत ५१६ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत युती किंवा आघाडी झालेली नसल्याने चौरंगी अथवा पंचरंगी निवडणूक होत असल्याचे चित्र दिसत आहे. शनिवार हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. सोमवारी अपक्ष व छोट्या पक्षांच्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल व त्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराच्या तोफा धडाडू लागतील.भाजपा, शिवसेनेसह सर्वच पक्षांनी अखेरच्या क्षणापर्यंत आपले उमेदवार जाहीर केले नव्हते. त्यामुळे पक्षातर्फे एबी फॉर्म न मिळाल्याने अनेकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरले होते. त्यातील काहींनी बंडाचा पवित्रा न घेता उमेदवारी अर्ज मागे घेतले, तर काहींनी बंडखोरीवर ठाम राहण्याचा निर्धार अखेरपर्यंत कायम ठेवला. शिवसेना, भाजपा, काँग्रेसने आपापल्या नाराजांची समजूत काढण्याकरिता अखेरपर्यंत प्रयत्न केले व त्यात त्यांना काही अंशी यश आले.बविआने आ. विनायक मेटे व मंत्री महादेव जानकर व निवृत्त पालिका आयुक्त शिवमूर्ती नाईक यांच्या अनुक्रमे शिवसंग्राम परिषद, राष्टÑीय समाज पक्ष व संघर्ष मोर्चासोबत आघाडी केली. शिवसंग्राम परिषद व राष्टÑीय समाज पक्षाच्या एकूण १० पैकी ६ उमेदवारांसाठी दोन जागा बविआने सोडल्या. काँग्रेसने १अ, २अ, ४अ व क, ६अ, ब व क, ७अ, ब व क, ८अ व ड, १३क, १४ब, १५अ व क, १८ड मध्ये उमेदवार उभे केले नसून काही इच्छुकांनी अपक्ष अर्ज दाखल केले होते. त्यांना पाठिंबा दिला. आता एकूण ५१६ उमेदवार आपले नशीब अजमावणार असून सर्वच प्रभागांत चौरंगी अथवा पंचरंगी लढती होणार आहेत. त्यामुळे फारच थोड्या मतांच्या फरकाने उमेदवार विजयी होतील.कुकरवाटपाचा आरोप : भार्इंदर पूर्वेच्या प्रभाग क्र.४ मध्ये मतदारांना कुकर वाटण्याचा प्रकार उघडकीस आला असून पालिकेच्या निवडणूक विभागाच्या पथकाने कुकर जप्त केला. मात्र, अद्याप कुणावरही कारवाई केलेली नाही. शुक्रवारी रात्री भार्इंदरच्या प्रभाग क्र. ४ मधील बाळाराम पाटील मार्गावरील ‘नर्मदा ज्योती’ इमारतीमध्ये कोणीतरी कुकर वाटत असल्याची तक्रार प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे यांच्याकडे करण्यात आली.त्यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने तेथील एका सदनिकेत जाऊन चौकशी केली. एक मुलगा येऊन त्या घरात कुकर देऊन गेला व त्याने एका नेत्याचे नाव सांगत पक्षाच्या चिन्हावर मत देण्यास सांगितल्याचे रहिवासी दीपचंद गुप्ता यांनी सांगितले. पथकाने तो कुकर जप्त केला. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.सलीम शेख भाजपातशिवसेनेत दाखल झालेले काँग्रेसचे माजी नगरसेवक सलीम शेख यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश केला. शिवसेनेला प्रभाग १५मध्ये भाजपाने दिलेला हा धक्का मानला जात आहे.पक्षनिहाय उमेदवारांची संख्याभाजपा : ९३, शिवसेना : ९४, राष्ट्रवादी काँग्रेस : ६७, काँग्रेस ७६, मनसे : २५, बविआ : २७, संघर्ष मोर्चा : १३, राष्ट्रीय समाज पक्ष : ४, भारतीय जनसंग्राम परिषद : ६एका मुलाने गुप्ता यांना आणून दिलेला कुकर जप्त केला आहे. मात्र, गुप्तांनी रीतसर तक्रार केली नसल्याने काही कारवाई केली नाही. कोणी कोणाचेही नाव घेईल, पण त्याचा पुरावा द्यायला हवा- सुदाम गोडसे, प्रभाग अधिकारी
चौरंगी निवडणूक अटळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 4:12 AM