मुंब्रा - शैक्षणिक साहित्यखरेदीसाठी बँकेतून पैसे काढण्यासाठी मुंब्य्रातील कौसा भागातील ठामपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी उपाशीपोटी कौसा भागातील एका बँकेसमोर बुधवारी मोठी गर्दी केली होती. शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना थेट देण्याची प्रथा मोडीत काढून त्याऐवजी त्यांच्या नावे बँकेत पैसे जमा करण्याची नवीन कार्यप्रणाली ठामपाच्या शिक्षण विभागाने सुरू केली आहे. या नवीन नियमानुसार विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावे बँकेत जमा झालेली रक्कम प्रथम काढून ती शाळेत जमा करून शाळेतून रोखीने विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य खरेदी करायचे. या द्राविडी प्राणायामामुळे तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या नावाने पैसे जमा असतील, त्याच विद्यार्थ्याला ते देण्याचा पवित्रा येथील एका बँकेने घेतल्यामुळे तीत जमा झालेले पैसे काढण्यासाठी विद्यार्थ्यांची बँकेत झुंबड उडाली होती. यातील अनेक विद्यार्थी वार्षिक परीक्षेचा पेपर देऊन उपाशीपोटी काही तास बँकेच्या परिसरात उन्हात उभे होते. यामुळे ते त्रस्त झाले होते. यामुळे त्यांची मोठी आबाळ झाली. पैशांसाठी होणारी त्यांची ही आबाळ थांबावी, यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना पैसे द्यावेत किंवा ते थेट शाळेच्या खात्यात जमा करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
चिमुरड्यांची भरउन्हात बँकेत झुंबड, शैक्षणिक साहित्यखरेदीसाठी खटाटोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 6:39 AM