उल्हासनगर : महापालिकेचे बेपत्ता नगररचनाकार संजीव करपे यांच्या प्रकरणाची सीआयडीतर्फे चौकशी करावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबाने मुख्यमंत्र्यांकडे केल्याने बिल्डर, पालिका अधिकारी, वास्तुविशारद यांचे धाबे दणाणले आहेत. पावणेदोन महिन्यांपासून बेपत्ता असलेले करपे यांच्याबाबत गूढ निर्माण झाले आहे. सध्या क्राइम ब्रँचतर्फे चौकशी सुरू आहे. मात्र, या यंत्रणेवर कुटुंबाने नाराजी व्यक्त केली आहे. सीआयडी चौकशी झाल्यास अनेकांना जेलची हवा खावी लागेल, असे बोलले जात आहे. करपे बेपत्ता झाल्याने संशयाची सुई त्यांचे सहकारी अधिकाऱ्यांसह बिल्डर, वास्तुविशारद व राजकीय नेत्यांवर आहे. सीआयडी चौकशीच्या मागणीने अनेक जण भूमिगत झाल्याचे बोलले जात आहे. पुण्याला बैठकीसाठी जात असताना बोरघाटात ते गाडीतून उतरले व चालकाला गाडी घेऊन परत पाठवले. त्यानंतर, ते बेपत्ता झाले. वादग्रस्त नगररचनाकार विभागात कोणताही अधिकारी येण्यास इच्छुक नसताना करपे यांची नियुक्ती झाली. सुरुवातीला त्यांनी बांधकाम परवान्यांवर सह्या करण्यास नकार दिला. मात्र, पालिकेला आर्थिक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांच्या आदेशानुसार बांधकाम परवाना शिबिरात तब्बल ३५ ते ४० बांधकामांना परवानगी दिली. यातून पालिकेला सात कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले. (प्रतिनिधी)
सीआयडी चौकशीच्या मागणीने धाबे दणाणले
By admin | Published: October 10, 2016 3:17 AM