मुंब्रा : पाण्यासाठी कौसा भागातील संतप्त नागरिकांनी सोमवारी ठामपाच्या मुंब्य्रातील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाला घेराव घातला. त्याचवेळी दूषित पाण्यामुळे त्रस्त नागरिकांनी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयावर ठिय्या धरला. ठाण्यात कपातीमुळे उद्यापासून वेगवेगळ््या ठिकाणी साधारण अडीच दिवस पाणीपुरवठा बंद आहे. त्यातच मुंब्रा परिसरातील भारत गिअर कंपनीजवळील पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरली जात नाही. यामुळे काही भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप नगरसेविका आशरीन राऊत काही दिवस वारंवार करीत आहेत. त्यात सुधारणा व्हावी, यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने दिली. त्यानंतरदेखील पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा न झाल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी घेराव घातला. या वेळी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अधिकारी मंगेश गीते यांनी भारत गिअरजवळील टाकी पूर्ण भरण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती राऊत यांनी दिली.कल्याणमध्ये ठिय्याकोळसेवाडी : कल्याण पूर्वेतील विविध प्रभागांत दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी ‘ड’ प्रभाग कार्यालयावर ठिय्या दिला. स्वराज्य सामाजिक संस्थेचे प्रथमेश सावंत यांच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात येऊन आमच्याशी बोलावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती. परंतु ते आले नाहीत. तसेच ‘ड’ प्रभाग क्षेत्र अधिकारी शांतिलाल राठोड कार्यालयात नसल्याने पाणीपुरवठा अभियंता अशोक घोडे यांनी निवेदन स्वीकारले. युद्धपातळीवर जलवाहिन्या दुरुस्त्यांचे काम करून पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली काढला जाईल, असे लेखी आश्वासन दिले. महेश शिंदे, सुनंदा शिंदे, अमोल साळुंखे आदी कार्यकर्त्यांनी चर्चेत सहभाग घेतला.
शहरांत पुन्हा एकदा पाणी पेटले
By admin | Published: April 05, 2016 1:22 AM