लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकांमध्ये लोकप्रतिनिधींची गरज असते. त्यांच्या माध्यमातूनच सभागृहात आवाज उठवला जातो. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होणे गरजेचे असल्याचे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. ज्या सोयीसुविधा महापालिकेने देणे अपेक्षित असते, त्या सुविधा विकासक देतात आणि पैसे कमावतात. त्यामुळे शहर हे महापालिका नाही तर बिल्डर लॉबी चालवत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
ठाण्यातील आझाद नगर सर्कल येथे देवीच्या दर्शनासाठी ते आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी राज यांनी शहरातील वाहतूक समस्या ते पॅनल पध्दतीने होत असलेल्या निवडणुकांबाबत चर्चा केली. मुळात पॅनल पध्दतीने निवडणुका ही काही राजकीय पक्षांची सोय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा भाजप यांनी ही पॅनल पध्दतीने निवडणुका घेण्याचे का ठरवले हा प्रश्न आहे. यापूर्वी निवडणुका होत नव्हत्या का, असा प्रश्न त्यांनी केला. या पॅनल पध्दतीत एकाच पक्षाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्येच एकमत नसते. मग नागरिकांच्या समस्या कशा सुटतील असेही ते म्हणाले. परंतु केवळ आपल्या फायद्यासाठी ही पॅनल पध्दती आणली गेल्याचा आरोपही त्यांनी केला.
वाहतूक समस्या सोडवायची असेल तर... वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ठोस नियमावली हवी. एका व्यक्तीकडे किती वाहने हवी यालाही मर्यादा हव्यात, मुळात आपल्या येथील नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सवय लागणे गरजेचे आहे. मेट्रोसारखे प्रकल्प तरच यशस्वी होऊ शकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. महत्त्वाचे म्हणजे ज्या सोयीसुविधा महापालिका प्रशासनाने देणे गरजेचे आहे. त्या सुविधा बिल्डर पुरवितात. त्यामुळे शहरे ही महापालिका नव्हे तर बिल्डर चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहर सुधारायचे असेल तर त्यासाठी काय पर्याय असू शकतो, असा सवाल त्यांना केला व लागलीच मीच शहर सुधारू शकतो, असे उत्तर दिले.