- प्रज्ञा म्हात्रे, ठाणे ठाणे महापालिका, नागरिक आणि व्यावसायिक यांना सांधणारा आणि केवळ कार्डद्वारे, पालिकेच्या सर्वसमावेशक अॅपद्वारे बँकिंगपासून शॉपिंगपर्यंत सर्व सेवांसाठी उपयुक्त ठरणारा ‘डीजी ठाणे’ हा प्रकल्प येत्या वर्षात प्रत्यक्षात येणार आहे. या प्रकल्पातून ‘डीजी ठाणे’द्वारे शहरातील नागरिक महापालिकेशी पूर्णवेळ कनेक्ट राहतील, अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. जगातील स्मार्ट शहर असलेल्या ‘तेल अवीव’च्या धर्तीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ‘डीजी ठाणे’ची संकल्पना मांडली आहे. ‘डीजी ठाणे’मध्ये केवळ डिजीटाजेशन पुरताच मर्यादित विचार करण्यात आलेला नाही. ठाणे पालिकेने बँकिंग हा महत्त्वाचा घटक या संकल्पनेला जोडला आहे. त्यामुळे अशा प्रकारचा भारतातील हा पहिलाच आगळावेगळा प्रकल्प ठरणार आहे, असा पालिका अधिकाऱ्यांना विश्वास आहे. ‘डीजी ठाणे’ या संकल्पनेतंर्गत विविध सहा महत्त्वाचे घटक आधारभूत मांडण्यात आले आहेत. त्यात वैयिक्तक माहिती सेवा, परिसरस्थित माहिती सेवा, नागरिकांचा सहभाग, विशेष मेंबरशीप, बक्षिस योजना आणि एकच डीजी कार्ड विविध सेवांसाठी वापरण्याच्या सुविधेचा समावेश आहे. एखाद्या व्यक्तीला संगीत, कला, क्रीडा, आरोग्य या गोष्टींमध्ये विशेष रूची असेल तर त्यास त्याच्या आवडीच्या गोष्टींविषयी वेळोवेळी माहिती दिली जाईल, जेणेकरून त्या व्यक्तीला त्याच्या आवडीच्या गोष्टींचा लाभ मिळेल. त्या-त्या परिसरातील विविध घटना, प्रदर्शन, शॉपिंग फेस्टिव्हल आदी माहिती कळविण्याची व्यवस्था या यंत्रणेत अंतर्भूत करण्यात आली आहे. या संकल्पनेमध्ये नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. या माध्यमातून नागरिकांच्या एका गटाला दुसऱ्या गटांशी किंवा नागरिकांना नागरिकांशी संवाद साधता येणार आहे.असे आहे डीजी कार्ड १डीजी कार्डमध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, या कार्डचा डेबिट, क्रेडिट किंवा एटीएमसारखा वापर करता येऊ शकणार आहे. त्यामुळे कार्डधारकास कधीही शॉपिंग करता येऊ शकेल किंवा विविध सेवांचे कर या कार्डद्वारे भरता येणे शक्य होणार आहे. २या कार्डचा वापर करून जेवढी खरेदी केली जाईल, तेवढे पॉइंट्स कार्डधारकास मिळणार आहेत. त्या पॉइंट्च्या बदल्यात कार्डधारकास विशेष लाभ मिळू शकतो. ३ सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, स्मार्ट पार्किंग, वाहतूक, आरोग्य सेवा, परिवहन सेवा, महापालिकांचे विविध कर हे या कार्डद्वारे भरण्याची सुविधा, यामध्ये केली आहे. त्यामुळे एका कार्डचा वापर अनेक कारणांसाठी नागरिकांना करता येणार आहे. याच पद्धतीने पालिकेचे अॅपही कार्यरत राहणार आहे.
‘डीजी ठाणे’ अॅपद्वारे नागरिक-पालिकेचा कनेक्ट
By admin | Published: January 01, 2017 3:50 AM