अंबरनाथ : टँकरमधील घातक रसायन रस्त्यावर पडल्याने कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावरून जाणा-या वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. अनेक वाहन चालकांना उग्र वासाचा आणि डोळे चुरचुरण्याचा त्रास सहन करावा लागला. सायंकाळी 6 वाजता ही घटना घडली असून, अगिशमन दलाने रस्त्यावर पाणी मारल्यावर तो त्रास कमी झाला. उल्हासनगरहून बदलापूरच्या दिशेने जाणा-या एका रसायनाने भरलेल्या टँकरला गळती लागल्याने त्या टँकरमधील घातक रसायन उल्हासनगरच्या साईबाबा मंदिर ते अंबरनाथ पोलीस स्टेशनपर्यंतच्या रस्त्यावर पडले होते. सुरुवातीला कोणालाच त्याची कल्पना आली नाही. मात्र काही वेळेतच रस्त्यावर उग्र वास आणि नागरिकांचे डोळे चुरचुरण्यास सुरुवात झाली.काही नागरिकांनी त्याची कल्पना लागतच असलेल्या अग्निशमन विभागाच्या कर्मचा-यांना दिली. कर्मचा-यांनी काही काळातच या रस्त्यावर पाणी मारून रसायनीची घातकता कमी केली. अवघ्या 15 मिनिटांतच नागरिकांना होणारा त्रास कमी झाल्यावर पोलिसांनी आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या घटनेनंतर लागलीच पोलिसांनी त्या टँकरचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच रस्त्यावर पडलेले रसायन काय होते याचा देखील तपास करीत आहेत. या टँकरने हे घातक रसायन कोणत्या कंपनीमधुन उचलले होते याचा देखील तपास पोलीस करित आहे. या प्रकारामुळे कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरील अंबरनाथ परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती.
टँकरमधील घातक रसायन रस्त्यावर पडल्याने नागरिक त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 7:47 PM