ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिल्या वर्षाच्या विकासपर्वाची गाथा सांगण्यासाठी रविवारी सायंकाळी झालेल्या मुंबई-कोकण प्रांताच्या रॅलीत भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांबरोबरच मोठ्या संख्येने ठाणेकरांनी सहभाग घेतला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून वर्षभरात घेण्यात आलेल्या महत्वाच्या निर्णयांची माहिती दिली. तर वर्षानुवर्षे रखडलेलेले निर्णय घेतल्याने जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
या रॅलीमध्ये भाजपाच्या प्रभारी सरोज पांडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर भाजपाच्या खोपट येथील कार्यालयातून जिल्हाध्यक्ष तसेंच आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, नगरसेवक संदीप लेले यांच्याबरोबरच अभिनेता अंगद म्हसकर, डॉ. राहुल कुलकर्णी, विघ्नेश जोशी, संजीव ब्रह्मे, धनंजय सिंग, मितेश शहा, रसिकलाल छेडा, सचिन मोरे आदी मान्यवर सहभागी झाले होते.
तर नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी ब्रह्रांड, नगरसेवक सुनेश जोशी यांनी नौपाडा मंडल कार्यालय, नगरसेविका स्नेहा आंब्रे यांनी हिरानंदानी मेडोज, नगरसेवक कृष्णा पाटील यांनी गोकूळनगर, नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी महागिरी कोळीवाडा, सुनील कोलपकर यांनी केबीपी डिग्री कॉलेज, सिद्धेश पिंगुळकर यांनी मंगला हायस्कूल, मुंब्र्यात कुणाल पाटील यांनी बाबाजी पाटील शाळा, भूषण पाटील यांनी संत ज्ञानेश्वर नगर, सिकंदर खान यांनी अर्सिया वेल्फेअर फाऊंडेशन, संतोष जैस्वाल यांनी टिकूजिनीवाडी, हिरसिंग कपोते यांनी कळवा, तन्मय भोईर यांनी बाळकूम पाडा नं. १, आदेश भगत यांनी दिवा, राम ठाकूर यांनी ओवळा, मंगेश ठाकूर यांनी आर. जे. ठाकूर कॉलेज, दादा पाटील वाडी आदी ठिकाणी भाजपा कार्यालये, मंडल कार्यालयांबरोबरच विविध ठिकाणी शेकडो कार्यकर्ते व नागरिकांनी सहभाग नोंदविला.
कोरोनाच्या आपत्तीत घेतलेले धाडसी निर्णय, आत्मनिर्भर भारताचा नारा, पीपीई किट्स निर्यातीत यश आदींबरोबरच वर्षभराच्या काळात बालाकोटवरील सर्जिकल स्ट्राईक व एअर स्ट्राईकने भारताचे शौर्य जगाने पाहिले. वन रॅंक वन पेंशन, वन नेशन-वन टॅक्स जीएसटी आदी दशकभरापूर्वीच्या मागण्या पूर्ण झाल्या. शेतकऱ्यांना उत्तम एमएसपी मिळाली. कलम ३७०, राम मंदिर उभारण्याचा निर्णय, तिहेरी तलाक, नागरिकत्व कायदा आदी निर्णयाने देशात नवा अध्याय रचला गेला, असे स्मृती इराणी यांनी नमूद केले.
मजबूत लष्करासाठी चीफ ऑफ डिफेंस पद, मिशन गगनयानची तयारी, पंतप्रधान किसान सन्मान निधी, जल जीवन मिशन, प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहिम, शेतकरी, शेतमजूर, लहान दुकानदार आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना मासिक पेन्शन आदी निर्णयांची माहिती व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये देण्यात आली.