लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : कोविड महामारीत पॅरोलवर जेलबाहेर आलेल्या माजी आमदार पप्पू कलानी यांनी अनेकांच्या घरी, सार्वजनिक मंडळांमध्ये जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत झाल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. तर, शहर विकासासाठी नागरिकांनी पप्पू यांना साद घातली. यामुळे उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
उल्हासनगर महापालिका व शहरावर दोन दशकांपेक्षा जास्त सत्ता गाजविणाऱ्या माजी आमदार पप्पू कलानी यांना भटिजा बंधूंच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली. पप्पू कलानी यांच्या पत्नी व माजी आमदार ज्योती कलानी यांच्या मृत्यूनंतर पप्पू यांना १५ दिवसांचा पॅरोल मिळाला होता. त्यानंतर कोविडमुळे वयोवृद्ध असलेल्या बहुतांश आरोपींना विनाअट पॅरोल मिळाला. त्यानुसार, पप्पू कलानी यांनाही पॅरोल मिळाला. एरव्ही, घराच्या बाहेर न पडणारे पप्पू कलानी यांनी गेल्या आठवड्यात मात्र सार्वजनिक मंडळे, जुने कार्यकर्ते तसेच विविध पक्षांच्या नेत्यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी पप्पू कलानी यांना नागरिकांनी शहर विकासासाठी साद घातली.