अंबरनाथ : अंबरनाथमधील प्राचीन शिव मंदिराचा परिसरात वसलेल्या प्रकाश नगर या झोपडपट्टीच पुनर्वसन करण्यासाठी नगरपालिकेकडून बायोमेट्रिक पद्धतीने सर्वे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र या परिसरात एस आर ए योजना लागू करताना नागरिकांना विश्वासात न घेतल्याने या ठिकाणच्या नागरिकांनी बायोमेट्रिक सर्वे ला विरोध केला आहे.
अंबरनाथ नगरपालिकेने एस आर ए योजनेअंतर्गत प्रकल्प हाती घेतला आहे. अंबरनाथ नगरपालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला स्थानिकांचा विरोध होत असल्याने बायोमेट्रिक सर्वे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांची आता नागरिकांकडून अडवणूक केली जात आहे. नगरपालिका स्थानिकांना विश्वासात न घेता बायोमेट्रिक पद्धतीचा वापर करून सर्वे करत असल्याने नागरिकांमधून याला आता विरोध होऊ लागला आहे. एकीकडे प्राचीन शिव मंदिराचा विकास करण्यासाठी नगरपालिकेकडून कार्यादेश काढण्यात आलेले असतानाच आता प्राचीन शिवमंदिर परिसरातील झोपडपट्टी उठवण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू केल्याने त्याला स्थानिकांचा विरोध होऊ लागलाय. त्यामुळे संतप्त झालेल्या सर्व स्थानिकांनी या बायोमेट्रिक सर्वेला विरोध करून आपला निषेध व्यक्त केला.
दुसरीकडे प्रकाशनगर मधील काही नागरिकांनी मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांची भेट घेत एसआरए योजनेमध्ये स्थानिकांना विश्वासात न घेतल्यास आमचा विरोध राहील अशी ठाम भूमिका मांडली. यावर मुख्याधिकारी रसाय यांनी देखील खुलासा करताना एस आर ए योजना ही नागरिकांच्या मागणीनुसारच राबवली जाते आणि यशस्वी केली जाते. त्यामुळे कुठलीही योजना लादण्याचा प्रयत्न होणार नाही नागरिकांना विश्वासात घेऊनच कामे केली जातील अशी ग्वाही दिली.