भिवंडी : महानगरपालिका क्षेत्रातील दररोज जमा होणारा सुमारे ४०० मेट्रिक टन कचरा हा चाविंद्रा येथील सिटी पार्क साठी आरक्षित असलेल्या जागेवर टाकण्यास नागरिकांनी विरोध दर्शवित गुरुवारी स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.यावेळी डंपिंगवर आलेल्या गाड्या देखील नागरिकांनी अडविल्या होत्या.जो पर्यंत यावर तोडगा काढत नाही तोपर्यंत डंपिंगवर गाड्या खाली करू देणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती.ऐन दिवाळीत कचरा प्रश्न पेटल्याने मनपा प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आंदोलनात माजी नगरसेवक विकास निकम,शरद धुळे,धनश्री राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात स्थानिक चाविंद्रा राम नगर पोगाव येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
येथील सिटी पार्क साठी आरक्षित भूखंडा वर तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेला डंपिंग ग्राउंड मागील १४ वर्षांपासून सुरू आहे.त्यामुळे स्थानिकांना दुर्गंधी सह धुरामुळे श्वसनाच्या त्रास होत असल्याने स्थानिक नागरीक तो बंद करण्या साठी मागणी करीत आहेत.मागील वर्षी पालिका प्रशासनाने एक वर्षाच्या मुदतीत डंपिंग ग्राउंड बंद करण्याचे लेखी आश्वासन स्थानिक माजी नगरसेवक विकास निकम यांच्या नेतृत्वा खालील शिष्टमंडळास दिले होते.ती मुदत संपल्या नंतर ही डंपिंग ग्राउंड सुरू असल्याने नागरीक पुन्हा आक्रमक झाले आहेत.गुरुवारी सकाळी माजी नगरसेवक विकास निकम यांच्या नेतृत्वाखाली डंपिंग ग्राउंड येथे उग्र निदर्शने करीत डंपिंग ग्राउंड वर येणाऱ्या वाहनांना येऊ दिले नाही.
यानंतर ही प्रशासन थांबले नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा विकास निकम यांनी दिला आहे.याच परिसरात पालिकेची प्राथमिक व माध्यमिक शाळा असून तेथे शेकडो विद्यार्थी व परिसरातील रामनगर,गायत्री नगर, चाविंद्रा ,पोगाव,नागाव या परिसरातील नागरिकांना धुरामुळे श्वसनाचे त्रास होत असल्याची तक्रार माजी नगरसेविका धनश्री पाटील यांनी केली आहे.या आंदोलन नंतर पालिका उपायुक्त दीपक झिंजाड यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन नागरिकांची समजूत काढत दिवाळी नंतर या प्रश्नावर चर्चा करू असा मार्ग काढत आंदोलनकर्त्यांना शांत केले .