भिवंडी: भिवंडीतील मानकोली अंजुर फाटा ते चिंचोटी या महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून खड्ड्यातून उडणाऱ्या धुळीनेही आता प्रवासी हैराण झाले आहेत. एकीकडे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टोल वसुली होत आहे तर दुसरीकडे रस्त्याच्या दुरावस्तेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाबरोबरच टोल कंपनीचे पुरता दुर्लक्ष झाले आहे.
गणेशोत्सवाचे निमित्त करत टोल कंपनीने या रस्त्यावर तात्पुरता दुरुस्तीचे काम हाती घेतले होते, मात्र बुधवारी रात्रभर कोसळलेल्या रिमझिम पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचले होते. त्यानंतर गुरुवारी पावसाने उघडीप दिल्यानंतर व चिखल सुकल्यानंतर या रस्त्यावर आता प्रचंड धूळ उडत आहे.ज्याचा त्रास वाहन चालकांसह प्रवाशांना होत आहे.
या रस्त्यावर नेहमी अवजड वाहनांची ये-जा असते त्यामुळे या अवजड वाहनांच्या मागे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून रस्त्यावर मोठमोठाले खड्डे व धुळीमुळे या रस्त्यावरून प्रवास करताना दुचाकीस्वारांना प्रचंड त्रास होत आहे. या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिक वारंवार करत असतानाही या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुरता दुर्लक्ष होत आहे.
या रस्त्यावर अवजड वाहनांची येजा असल्याने कंपनी मोठ्या प्रमाणात टोल वसुली करत आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे उत्पन्न करूनही टोल कंपनी रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करीत असून या रस्त्यावरून प्रवास करतांना प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.