सदानंद नाईक
उल्हासनगर - महापालिका प्रभाग क्रं-७ खेमानी परिसरातील हनुमाननगर मधील सार्वजनिक शौचालय दरवाजे विना असून नागरिकांना नाईलाजास्तव छत्रीचा आढावा घ्यावा लागत आहे. मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांनी दरवाजे दुरुस्ती करण्याचे पत्र बांधकाम विभागाच्या पाठविले असून शहरातील सर्वच शौचालयाच्या दुरुस्तीचे प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती दिली.
उल्हासनगर महापालिकेने शहर हागणदारी मुक्त व स्वच्छ करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून, बहुतांश शौचायचे नुतनीकरण करण्यात आले. मात्र काही ठिकाणी शौचालयाचे दरवाजे व खिडक्या चोरीला जात असल्याने, नागरिकांची कुचंबणा होत आहे. महापालिका प्रभाग क्रं-७ मधील हनुमाननगर मध्ये महापालिका व एमएमआरडीएने सार्वजनिक शौचालय बांधले आहे. मात्र त्याची दयनीय व्यवस्था झाली. शौचालयाला दरवाजे नसल्याने, नागरिकांना घरून छत्र्या आणून त्या आड नैसर्गिक विधी करावा लागत आहे. सदर प्रकार मनसेचे युवानेते प्रवीण माळवे यांच्या लक्षात आल्यावर, त्यांनी नव्याने दरवाजा बसविण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला. दरम्यान दरवाजे विना शौचालयाची चर्चा शहरात रंगली.
महापालिका प्रभाग क्रं-७ चे नगरसेवक हे रिपाइंचे गटनेता व उपमहापौर भगवान भालेराव तसेच प्रभाग समिती क्रं-३ च्या सभापती शुभांगी निकम आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता भालेराव यांनी शौचालयाचे कामाला मंजुरी मिळाल्याची माहिती दिली. तर शुभांगी निकम यांनी शौचालयाचे दरवाजे व खिडक्यांची वारंवार चोरी होत असल्याची प्रतिक्रिया दिली. महापालिकेचे मूख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांनी शौचालयांच्या दुरुस्तीची माहिती बांधकाम विभागाकडे पाठविली असून शौचालयाची लवकरच दुरुस्ती होणार असल्याची माहिती दिली. तर उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी महापालिकेच्या सर्वच शौचालयाची दुरुस्ती करण्यात येणार असून दुरुस्तीची निविदा तब्बल ३० टक्के कमी दराने आली. लवकरच शौचालयाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती दिली आहे.
प्रवीण माळवे यांच्या तक्रारीनंतर जाग
महापालिका प्रभाग क्रं-७ हनुमाननगर येथील सार्वजनिक शौचालय दरवाजे विना असून नागरिक छत्रीचा आडोसा घेऊन नैसर्गिक विधी करीत असल्याची तक्रार मनसेचे पदाधिकारी प्रवीण माळवे यांनी महापालिकेला केली. त्यानंतर महापालिकेला जाग येऊन शौचालय दुरुस्तीसाठी पळापळ सुरू झाल्याचे चित्र महापालिकेत होते.