लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी संतांविरुद्ध केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शनिवारी वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्ववादी संघटनांनी ठाणे बंद पुकारला हाेता. या बंदमुळे ठाण्यातील मुख्य बाजारपेठ, दुकाने उघडली नाहीत. सकाळी स्टेशन परिसरात रिक्षा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प हाेती. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. दुपारी १ वाजेपर्यंत बंदचा परिणाम झाला. त्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाल्याचे दिसून आले.
मुख्य बाजारपेठेत असलेल्या विठ्ठल मंदिरापासून शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास वारकऱ्यांनी लाँग मार्च काढला होता. हाती टाळ आणि चिपळ्या घेऊन हरिनामाचा गजर करून वारकऱ्यांनी निषेध व्यक्त केला. जांभळी नाका येथे आंदाेलकांनी अंधारे यांच्या विचारांचे श्राद्ध घालून पिंडदान केले. यात बाळासाहेबांची शिवसेना व भाजपने सहभाग घेतला होता. यावेळी, अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी या बंदला आम्ही पाठिंबा दिल्याचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितले. सकाळपासूनच शहरात बंदचा परिणाम दिसून येत हाेता. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि पदाधिकाऱ्यांनी लोकलने प्रवास करून मुंबई गाठली.
प्रवाशांना बसमधून उतरवलेठाणे बंदची हाक दिली असताना एलबीएस मार्गावरून येणाऱ्या बेस्टच्या बस रहेजा तिनहात नाका भागात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अडविल्या. तसेच प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
काही शाळाही ठेवल्या बंदठाणे बंदचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये यासाठी शहरातील काही खासगी शाळांनी शनिवारी सुटी जाहीर केली. काही शाळांत शनिवारी विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर होता. ताे सोमवारी घेतला जाणार आहे.
दिव्यातही बंददिव्यातही भाजपतर्फे बंद पाळण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. दिवा भाजप व हिंदू संघटनांनी सुषमा अंधारे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध केला.