लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील शंभराहून जास्त सदनिका असलेल्या गृहसंकुलांना स्वतःच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आणि ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासंदर्भात नगरपालिकेने नोटीस बजावली आहे. त्याला शहरातील सर्व सोसायट्यांनी कडाडून विरोध केला आहे. एवढेच नव्हे तर सोसायटीतील कचरा न उचलल्यास तो कचरा पालिका कार्यालयाबाहेर टाकून आंदोलन करू, असा इशाराही दिला आहे.
सुमारे १०० पेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहसंकुलांनी सोसायट्यातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करावी, सोसायट्यांमधील कचरा उचलणार नाही, असा फतवा नगरपालिका प्रशासनातर्फे काढला होता. गेल्या पाच दिवसांपासून कचरा न उचलल्याने मोठ्या सोसायट्यांच्या परिसरात कचऱ्याचे ढीग तयार झाले असून येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. गुरुवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांना अंबरनाथ पूर्वेतील मोठ्या गृहसंकुलातील रहिवाशांनी घेराव घालत संताप व्यक्त केला.
अंबरनाथ नगरपालिकेच्या चिखलोली येथील नव्या डंपिंग ग्राउंडची क्षमता कमी असल्याने नगरपालिका प्रशासनाने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यानंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून पालिका प्रशासनाने मोठ्या गृहसंकुलांमधून कचरा उचलण्याचे बंद केले. त्यामुळे मोठ्या संकुलात कचराकोंडी पाहायला मिळते आहे. या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची भीती असल्याने हा कचरा उचलावा, अशी मागणी आता गृहसंकुलांकडून होताना दिसते आहे.