५७९९ पैकी १४२९ गणेश व गौरी मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा भाईंदर महानगरपालिकेने ४ कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनासाठी नागरिकांनी प्राधान्य द्यावे यासाठी ‘पर्यावरण रक्षक’ म्हणून प्रमाणपत्र देण्याचा सुरू केलेल्या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी एकूण ५७९९ गणेश व गौरी मूर्तींपैकी १४२९ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन केल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी गणरायाच्या ५५८४ व २१५ गौरी-मूर्तींचे विसर्जन शहरातील तलाव, खाडी व समुद्र किनारे तसेच कृत्रिम तलावात संपन्न झाले. यंदा तलावांचे जलप्रदूषण व पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याकरिता महापालिका प्रशासनास सहकार्य करून नागरिकांना कृत्रिम तलावांत गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करणाऱ्या नागरिकांना ‘पर्यावरण रक्षक’ म्हणून प्रशस्तिपत्र महापालिकेच्या वतीने देण्यास सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाला प्रतिसाद देत एकूण १४२२ गणेश व सात गौराई मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनीही त्यांच्या घरच्या गौरीच्या मूर्तीचे विसर्जन नवघर येथील कृत्रिम तलावात केले. कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करणाऱ्या नागरिकांना आयुक्त दिलीप ढोले तसेच अन्य अधिकारी आदींच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा सन्मान केला गेला. सर्वांनी श्रीगणेश विसर्जनासाठी केलेल्या सहाकार्याबद्दल आभार व्यक्त करून यापुढेही विसर्जनाच्या वेळी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे.