ठाणे : गेल्या अनेक शतकांचा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठाण्याची ओळख तलावांचे शहर अशी होती. मात्र आजच्या समृद्ध ठाणे शहराची ही ओळख पुसली जातेय की काय? असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. ती ओळख जपायची असेल तर ठाणेकर नागरिकांनी तलावांच्या संवर्धनासाठी स्वतः एक तरी पाऊल उचलणे गरजेचे आहे." असे लेखिका नूतन बांदेकर यांनी रसिक वाचक समूहाच्या पुस्तक परिचय कार्यक्रमात बोलताना सांगितले.
पुढे त्या म्हणाल्या की 'ठाणे तेथे काय उणे' असे असले तरी समृद्ध असलेल्या आजच्या नव्या ठाण्यात अनेकांना ही ओळख माहीतही नाही. ६० पेक्षा अधिक तलाव असलेल्या ठाण्यात आज प्रत्यक्ष किती तलाव आहेत हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी तलावांची शोध मोहीम सुरू झाली आणि त्या प्रवासात अखंडपणे ४२ तलावांची शब्दचित्रे रेखाटली गेली. त्यांचेच पुस्तकरूपात एकत्रीकरण झाले. तलावांच्या शोध मोहीमेदरम्यानचे अनेक प्रसंग, अडचणी आणि चांगले अनुभव याबद्दल माहिती देताना त्या म्हणाल्या की प्रत्येक तलावाची एक कथा आहे, एक व्यथा आहे. ती समजून घेण्यासाठी किमान आपल्या जवळच्या तलावाला भेट देऊन त्याला जाणून घेणे आवश्यक आहे.
यासाठी पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 'माझा तलाव' मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. त्यात सर्व पर्यावरण प्रेमी आणि ठाणेकर जनतेने सहभागी होऊन तलाव संवर्धनासाठी आपले योगदान दिले पाहिजे. त्यामध्ये प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या जवळच्या तलावाची ओळख करून देण्यात येत आहे. पुढच्या पिढीला पर्यावरण संवर्धनाचे धडे आतापासूनच दिले जावेत आणि ठाणे शहरातील तलावांचे भविष्य जपले जावे. असा महत्त्वाचा विचार माझा तलाव मोहिमेमागे आहे. तसेच 'सफर तलावांची' ही दोन भागांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या तलावांच्या सहलीविषयी देखील त्यांनी माहिती दिली. रसिक वाचक समूह आयोजित या पुस्तक परिचय व्याख्यान मालेतील आजचे ७६ वे पुष्प ऑनलाईन पद्धतीने गुंफले. समूहाचे प्रतिनिधी भूषण मुळ्ये यांनी, लेखिका बांदेकर यांचे आभार मानले.