लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे ठाणे शहरातील नागरिकांनी रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याला १०० टक्के प्रतिसाद दिला. त्यामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त नसतांनाही अक्षरश: शुकशुकाट होता. नागरिकांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल ठाण्यातील लोकप्रतिनिधी आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ठाणेकरांचे आभार मानले आहेत.कोरोना या संसर्गजन्य आजाराचा फैलाव आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन दिवसांपूर्वीच ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी हॉटेल, सर्व दुकाने, पान टपऱ्या बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यापाठोपाठ २२ मार्च रोजी जनतेने उत्स्फूर्त बंद पाळण्याला पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला सर्व नागरिक, व्यापारी आणि वाहन चालकांनीही उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला. सकाळी ७ ते ८ या काळात दूध आणि अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठीची तुरळक गर्दी वगळता शहरातील सर्वच भागांमध्ये कोणीही रस्त्यावर नव्हते. नेहमीच गजबजलेल्या शहरातील जांभळी नाका, इंदिरानगर, कळवा, मुंब्रा येथील मुख्य बाजारपेठांसह सर्वच रस्त्यांवरही पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह कोणीही नव्हते. लोकमान्यनगर, सावरकरगगर, शास्त्रीनगर, मानपाडा, कोपरी, आनंदनगर येथील सर्वच ठिकाणच्या रस्त्यांवर क्वचित एखादे वाहन वगळता कोणतेही वाहन किंवा कोणीही व्यक्ती नव्हते. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या आणि नेहमीच वाहतूक कोंडीमध्ये असलेल्या घोडबंदर रोड, आनंदनगर कोपरी नाका, मुलूंड चेकनाका, कापूरबावडी जंक्शन, नौपाडा आणि डॉ. आंबेडकर रस्ता तसेच ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते आणि सॅटीस हे सर्वच रस्ते निर्मनुष्य झाले होते. सॅटीस येथून टीएमटी, एसटी आणि रिक्षांची वर्दळ ही नेहमीच पहायला मिळते. परंतू, रविवारी याठिकाणी सकाळी केवळ १० वाजेपर्यंत टीएमटी सुरु होत्या. तर प्रवाशांच्या अभावी रिक्षा आणि एसटी मात्र सोडण्यात न आल्यामुळे याठिकाणीही वाहन किंवा लोकांची कोणतीही गर्दी गेल्या कित्येक वर्षांच्या इतिहासात प्रथमच पहायला मिळाली.
* इंदिरानगर येथील मासळी बाजारही बंदएरव्ही, प्रत्येक रविवारी प्रचंड गर्दी असलेल्या ठाण्यातील इंदिरानगर येथील मासळी आणि भाजी मार्केटमध्ये २२ मार्च रोजी मात्र सकाळी ७ वाजल्यापासून विक्रेते किंवा ग्राहक यांच्यापैकी कोणीही फिरकले नाही. त्यामुळे इथल्या व्यापा-यांनी एक दिवसाची सक्तीची विश्रांती घेतली. अशीच परिस्थिती जांभळी नाका येथील शिवाजी मार्केट आणि मासळी बाजार तसेच मानपाडा आणि लोकमान्यनगर येथील लाकडी पूलावरील मार्केटमध्येही होती.
* नागरिकांनी पोलिसांना दाखविले माणूसकीचे दर्शनसकाळी ६ वाजल्यापासून वर्तकनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ढोले, स्रेहल अडसुळे आणि जमादार प्रताप येरुणकर आदींचे पथक बंदोबस्तासाठी तैनात होते. त्याच ठिकाणी नाका कामगार नेहमी बिगारी कामासाठी गर्दी करीत असतात. या पोलिसांशिवाय रविवारी कोणीही नव्हते. भर उन्हात असलेल्या या पोलिसांसाठी वर्तकनगरच्या आसावरी सोसायटीतील वसंत राजूरकर, देवरास राऊत तसेच सहकार नगरातील किशोर साळूंखे, अभय पाटील, बाळासाहेब टाले आणि विठ्ठल जाधव आदींनी भर उन्हात कर्तव्य बजावणाºया पोलिसांसाठी मोफत उपहाराची सोय केली होती.* टीएमटी तीन तास ४० टक्के सुरु
ठाणे परिवहन सेवेच्या बस सकाळी ५ ते १०.३० वाजेपर्यंत ४० टक्के सुरु होत्या. या काळात बहुतेक बस या रिकाम्याच धावत होत्या. पवारनगरच्या एका बसच्या वाहकाकडे त्या काळात केवळ १४९ रुपयांची रोकड जमा झाली. नंतर संपूर्ण दिवसभर कळवा, वागळे इस्टेट आणि मुल्ला बाग या तिन्ही आगारातून एकही बस बाहेर पडली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचवेळी ठाण्यातील सर्व खासगी बस सेवाही बंद ठेवण्यात आली होती.
‘‘ ठाणेकरांनी कोरोनाविरुद्धच्या या लढयासाठी आवाहन केल्याप्रमाणे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेटमधील सर्वच पाचही परिमंडळांमधील परिसरात अत्यंत तुरळक ठिकाणी लोकांना हटकावण्याचे प्रसंग घडले. सकाळी ७ ते ८.३० हा पहिला दीड तास वगळता संपूर्ण दिवसभर कोणीही रस्त्यावर आलेले नव्हते. पोलिसांनीही चांगला बंदोबस्त ठेवला होता. शहरात पुन्हा रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत मनाई आदेश आणि संचारबंदी लागू केली आहे.’’विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर