मीरा रोड / भाईंदर : भाईंदर पूर्वेच्या क्विन्स पार्क भागातील मुख्य रस्त्यावर आधीच फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाने नागरिक त्रासले असताना आता पालिकेने येथील रस्ते खोदून ठेवल्याने त्रासात मोठी भर पडली आहे. येथील दीपक रूग्णालयापासून आत जाणाऱ्या मुख्य मार्गावर तसेच नाक्यावर दुकानदार व फेरीवाल्यांनी पदपथ तसेच रस्ता व्यापून टाकला आहे. त्यामुळे या भागात सकाळ, संध्याकाळ नेहमीच चालण्यास जागा नसते.
या भागात मोठ्या शाळा व निवासी संकुले असल्याने मोठी वर्दळ असते. परंतु अतिक्रमणा मुळे चालणे जिकरीचे होते. वाहतूककोंडी आणि त्यावरून भांडणे तर नेहमीच होतात. महापालिका, स्थानिक नगरसेवक व पोलिसही या अतिक्रमणांकडे नेहमीच कानाडोळा करत असल्याने रस्ते- पदपथ नागरिकांसाठी की अतिक्रमण करणाऱ्यांसाठी? असा सवाल नेहमीच नागरिक करतात.हा जाच कमी की काय म्हणून महापालिकेने या ठिकाणी विविध कामांसाठी रस्ता खोदून वेळकाढूपणा चालवल्याने नागरिकांच्या होणाºया जाचाने कळस गाठला आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यासाठी खोदकाम करुन ठेवण्यात आले होते. त्याचवेळी गटाराचे खोदकाम केले जात होते. त्यामुळे रस्त्यात खड्डे पडले. त्याचा त्रास सहन करता करता आता मुख्य नाक्यापासून अर्धा रस्ता खोदून ठेवला आहे.अर्ध्या रस्त्याचे खोदकाम केल्याने पादचाºयांसह वाहन चालकांना रस्त्यावरून जाणे जिकरीचे बनले आहे. दुचाकी, चारचाकीचे चाक रस्त्यावरून खाली खड्ड्यात जाण्याचे प्रकार घडत आहेत. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आदींनाही या अर्धवट रस्ते खोदकामामुळे जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. रस्त्याचे खोदकाम केले असता त्यातही फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम असल्याने त्रासात भरच पडत आहे. वाहतूक आणि रहदारीचा पुरता खेळखंडोबा झाला असून कामासाठीचे मोठमोठे दगड, वाळू पसरलेली आहे. अर्धवट खोदकाम केलेल्या रस्त्याच्या बाजूला कोणत्याही प्रकारचे सुरक्षिततेसाठीचे उपायच केलेले नाहीत. रात्रीच्यावेळी अपघाताची भीती वाटू लागली आहे.खोदकामामुळे धुळीचे साम्राज्य :खोदकामामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. दुकान, घरात धुळीच्या थराने नागरिक त्रासले आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असून श्वसनाचे विकार वाढल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.