मीरारोड - मीरा भार्इंदरच्या नागरीकांवर एकीकडे करवाढीचा बोजा टाकतानाच दुसरीकडे पालिका तिजोरीत पैसे नाहित म्हणून मच्छरना आळा घालण्यासाठी फवारणी करणारया १८० कर्मचारयांना घरी बसवणारया मीरा भाईंदर महापालिकेचे नगरसेवक मात्र जनतेच्या पैशांवर मौजमजा करण्यासाठी भारताचे स्कॉटलँड म्हणून ओळखल्या जाणारया कर्नाटकच्या कूर्ग या पर्यटनस्थळी जाणार आहेत. अभ्यास दौरा असं नेहमीप्रमाणे गोंडस नाव त्यासाठी दिलं गेलं असलं तरी तब्बल ४५ लाखांची उधळपट्टी करण्याचा घाट घालण्यात आलाय.मीरा भाईंदर महापालिकेच्या साफसफाई, पाणी पुरवठा आदी सेवा तोट्यात असतानाच पालिकेवर विकासकामां साठी कर्जाचा बोजा असल्याचे कारण सांगुन सत्ताधारी भाजपाने नागरीकांवर पाणी पट्टी व मालमत्ता दरात वाढीसह नव्याने मलप्रवाह कर, घनकचरा शुल्क व पाणी पुरवठा लाभकरचा बोजा स्थायी समिती मध्ये मंजुर केला होता.परंतु एकीकडे थकबाकी वसुली करायची नाही, कार्यक्रम व दालनांसाठी उधळपट्टी तसेच विविध समस्यांची मांदियाळी, अनागोंदी असताना भाजपाने नागरीकांवर मोठ्या प्रमाणात करवाढ लादल्याच्या निषेधार्थ विविध स्तरातुन टिकेची झोड उठु लागली. त्यामुळे महासभेत भाजपाने पाणीपट्टी व मालमत्ता दरात वाढी सह घनचकरा शुल्क आकारण्यास मंजुरी दिली.नागरीकांवर एकीकडे करवाढीचा बोजा टाकताना दुसरी कडे मच्छरांच्या निर्मुलनासाठी फवारणी करणारया १८० कर्मचारयांना पैसे नाहित म्हणुन कामावर कमी करण्यात आले आहे. परंतु दुसरीकडे मात्र स्थायी समिती मध्ये सर्व ९५ नगरसेवकांसाठी अभ्यास दौरयाच्या नावाखाली पर्यटन स्थळी मौजमजेसाठी जाण्याचा ठराव मंजुर केला आहे.भारताचे स्कॉटलेंड म्हणुन ओळख असलेले कूर्ग या पर्यटन ठिकाणी हा अभ्यास दौरा जाणार आहे. त्यासाठी ४५ लाख रुपयांची तरतुद करुन ठेवण्यात आली आहे. आधी २० ते ३० एप्रिल दरम्यान हा दौरा काढण्याचे ठरवले होते. परंतु अनेक नगरसेवकांनी मुलांच्या परिक्षा आदी कारणं पुढे केल्याने आता २ मे ते ६ मे अशी दौरयाची तारिख निश्चीत करण्यात आली आहे.या दौरयासाठी येण्यास इच्छुक असणारया नगरसेवकां कडुन सचीव कार्यालयाने संमती पत्रं मागवली आहेत. ज्यांना दौरयाला यायचं आहे त्यांनी होय वा नाही यायचं आहे त्यांनी नाही म्हणुन लेखी स्वरुपात पत्र द्यायचे आहे. आता पर्यंत ३५ नगरसेवकांनी लेखी पत्र देऊन कूर्ग येथील दौरयाला येणार असल्याची संमती दिली आहे असे सुत्रांनी सांगीतले.नगरसेवक हे विमानाने मँगलोर येथे उतरतील. कूर्ग येथे ३ रात्र तर उडपी येथे एक रात्र असा या नगरसेवकांचा मुक्काम असणार आहे. भारताच्या या स्कॉटलँड मध्ये नगरसेवक पर्यटनाची मजा लूटणार आहेत. गोल्डन टेम्पल म्हणुन ओळखले जाणारे नमुद्रलिंग मठ, कुशल नगर येथील एलिफंट दुबारे , नागरहोल राष्ट्रिय उद्यान , कावेरी नदिच्या उगम स्थानी असलेले तालकावेरी आदी विविध पर्यटन व धार्मिक स्थळांना नगरसेवक भेटी देतील. आलिशान तारांकित हॉटेल मध्ये ते राहणार आहेत.तीन रात्र व चार दिवस कूर्ग या पर्यटनस्थळी जनतेच्या पैशां मधुन पर्यटनाचा आनंद लुटतील . तर फक्त एक दिवस उडपी महानगर पालिकेला भेट देतील अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.विशेष म्हणजे या आधी देखील अभ्यास दौरयाच्या नावाखाली नगरसेवक व अधिकारयांनी देश भरातील विविध पर्यटनस्थळांना भेटी जनतेच्या पैशातुन मौजमजा केली आहे. अगदी काही अन्य पर्याय शोधुन परदेश दौरे देखील केले गेले आहेत.
नागरीकांवर करवाढीचा बोजा टाकून नगरसेवक जनतेच्या पैशातून चालले फिरायला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2018 8:52 PM