भिवंडी: भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी व होणारे अपघात या संदर्भात उपाय योजना करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी संबंधित यंत्रणांना दिले असल्याची माहिती भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी मंगळवारी दिली आहे.
भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांसह स्थानिक नागरिक व प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.त्यातच या मार्गाच्या दुरावस्थेमुळे व नियोजन शून्य कारभारामुळे या मार्गावर नेहमीच अपघात होत असून या अपघातांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहेत तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या मार्गाच्या मार्गावरील वाहतूक कोंडीतून व रस्ते अपघातातून येथील नागरिकांची सुटका व्हावी यासाठी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत दखल घेण्याची विनंती केली होती.आमदार रईस शेख यांच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मुंबई मंत्रालयातील कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकी मध्ये मंत्री दादा भुसे, मंत्री रवींद्र चव्हाण व इतर आमदार महोदय व अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत या महामार्गावर नागरिकांना होणाऱ्या अडचणी, वाहतूक कोंडी, महामार्गावर होणारे अपघात महामार्गावरील खड्डे व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली असून या बैठकीत मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरुस्तीबाबत व वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.
या बैठकीत मुंबई नाशिक महामार्गावर एमएसआरडीसी आणि सार्वजनीक बांधकाम विभाग संगनमताने देखरेख करतील अशा सूचना पवारांनी दिल्या असून एमएसआरडीसी मार्फत अधिकचे वार्डन पुरविण्याचे निर्देश दिले असून येणाऱ्या काही दिवसामध्ये महामार्गावर पाहणी दौरा करण्याचे निर्देश देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत अशी माहिती आमदार शेख यांनी दिली असून या निर्णयांमुळे या मार्गावरीक वाहतूक कोंडी व अपघातातून नागरिकांची सुटका होणार असल्याचे आशा आमदार रईस शेख यांनी व्यक्त केली आहे.