बदलापूर : मित्रपक्षांच्या तुलनेत भाजप नगरसेवकांच्या प्रभागातच खऱ्या अर्थाने विकास झाला असल्याचा दावा भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष आमदार किसन कथोरे यांनी नामोल्लेख न करता शिवसेनेला टोला लगावला. भाजपचे नगरसेवक असलेल्या २० प्रभागात झालेली विकासकामे पाहिल्यानंतर विकास कुणाच्या प्रभागात झाला हे नागरिकांच्या लक्षात येईल, असा दावाही त्यांनी केला.
बदलापूर पूर्वेकडील गीते मैदानात नगरसेविका अंजली गीते यांच्या वतीने झालेल्या ‘जागर स्त्रीशक्तीचा’ या कार्यक्र मात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया महिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्र मात उपस्थितांशी संवाद साधताना कथोरे यांनी वरील दावा केला. आमच्या हातात पालिकेची सत्ता नव्हती तरी आम्ही नगरपालिकेकडून विकासकामांसाठी निधी मागण्याचा प्रयत्न केला नव्हता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूरकरांना दिलेला शब्द पाळून सर्वांनाच मागेल तेवढा निधी विकासकामांसाठी दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रभागातील सर्व रस्ते काँक्र ीटचे झाल्याशिवाय राहणार नाहीत, असे आश्वासन आपण नगरसेविका गीते यांना दिले होते. त्यानुसार त्यांच्या प्रभागातील दोन कोटी रु पयांच्या मुख्य रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. भाजप नगरसेवकांच्या प्रभागात आणखी एक कोटींची कामे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कात्रप भागात ५४ एकर जागेवर मेट्रो कारशेड होणार असल्याचे सांगून कांजूरमार्ग-ऐरोली - शीळफाटा मार्गे मेट्रो बदलापूरपर्यंत येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या कामासाठी १३ हजार ५०० कोटी रु पये मंजूर करण्यात आले असून लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. बदलापूर व कात्रप परिसरात मेट्रोच्या रूपाने सर्वात चांगले काम होणार असून, आपल्यासाठी हा विकासाचा महत्त्वाचा टप्पा असणार असल्याचे कथोरे यांनी सांगितले.