सदानंद नाईक
उल्हासनगर : कुर्ला कॅम्प ते कैलास कॉलनी मुख्य रस्त्यावरील पूल दोन महिन्यापूर्वी खचला असून पूल कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून पुलावर लोखंडी बॅरेकेट्स लावल्या असल्या तरी लवकरात लवकर पूल दुरस्तीची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ व ५ मधून जाणाऱ्या कुर्ला कॅम्प ते कैलास कॉलनी मुख्य रस्त्यावरील समतानगर नाल्यावरचा पूल एका बाजूने सप्टेंबर महिन्यात खचला आहे. महापालिकेने सुरक्षेचा उपाय म्हणून रस्ता एका बाजूने बंद करून लोखंडी बॅरेकेट्स लावण्यात आल्या. तसेच लवकरच पुलाची दुरस्ती करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यावेळी महापालिकेच्या वतीने देण्यात आले. मात्र दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही पुलाच्या कामाला मुहूर्त मिळाला नाही. पुलाच्या दुसऱ्या मार्गावरून जड वाहन गेल्यास पूल पूर्णतः कोसळण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान प्रभाग समिती सभापती व स्थानिक नगरसेविका अंजली साळवे यांनीही महापालिका बांधकाम विभागाला माहिती देऊन पुलाच्या दुरस्तीची मागणी केली.
महापालिका बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश शितलाणी यांच्या सोबत संपर्क केला असता, होऊ शकला नाही. तसेच प्रभाग समिती क्र-४ च्या कार्यालयाशी संपर्क केला असता, पूला बाबत बांधकाम विभागाला माहिती दिली. असे सांगण्यात आले. समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांनी खचलेल्या पुलाबाबत ऑनलाईन महापालिकेकडे पाठपुरावा केला. मात्र त्यांनाही काहीएक उत्तरे दिले नाही. असे त्यांचे म्हणणे आहे.