लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर: महापालिका सिंधू भवनात फाळणी स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी फाळणीच्यावेळी सिंधी समाजावर झालेल्या अन्यायाला उजाळा देण्यात आला. सीसीएअंतर्गत पाकिस्तानातूनउल्हासनगरसह अन्य शहरांत आलेल्या ५४ जणांना यावेळी नागरिकत्व देण्यात आले. कार्यक्रमाला पालिका आयुक्त अजीज शेख, सिंधी कौन्सिलचे महेश सुखरामानी उपस्थित होते.
पालिका सिंधू भवनात स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद, महाराष्ट्र सिंधी साहित्य ॲकॅडमी, सिंधी कलाकार संगम आणि पालिका यांच्यावतीने विभाजन विभाषिका स्मृती दिवसाचे आयोजन केले होते. पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदूंवर अन्याय सुरू असून, या अन्यायाला कंटाळून काही वर्षांपूर्वी पाकिस्तानातून उल्हासनगरात आलेल्या ५४ सिंधी नागरिकांना (सीसीए) नागरिकत्व सुधारणा कायद्यान्वये भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, किशोर गवस, उपायुक्त सुभाष जाधव आदी उपस्थित होते.
अत्याचाराच्या मांडल्या व्यथा
प्राध्यापिका प्रिया वाच्छानी आणि सीमा मेंघानी यांच्या प्रयत्नातून सिंधी संस्कृतीच्या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. देशाचे नागरिकत्व मिळालेल्या नागरिकांनी पाकिस्तानात त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या व्यथा मांडल्या. पाकिस्तानात त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांचा व्यवसाय आणि धर्म सुरक्षित ठेवणे त्यांना किती कठीण गेले, याबाबत माहिती दिली. हिंदू म्हणून भारतात कसे सुरक्षित आहोत. याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. या सिंधी भाषिकांना नागरिकत्वासाठी भारतीय सिंधू सभेने मदत केली.
१५० जण नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत
भारताच्या सीएए कायद्यानव्ये १५० जण नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी ५४ जणांना गेल्या तीन महिन्यांत नागरिकत्व मिळाले आहे. अन्य जणांनाही लवकरच नागरिकत्व मिळेल, अशी माहिती महाराष्ट्र सिंधी साहित्य ॲकॅडमीचे अध्यक्ष महेश सुखरामानी यांनी यावेळी दिली.