उल्हासनगर : नगररचनाकारविना विभागाचे काम ठप्प झाले आहे. नगररचनाकार संजीव करपे बेपत्ता झाल्यापासून विभागाला नगररचनाकारच मिळालेला नाही. त्यामुळे विभागाचे कोटयावधीचे उत्पन्न बुडत असून बांधकाम प्रस्ताव धूळखात आहेत. उल्हासनगर नगररचनाकार विभाग नेहमी वादात राहिला आहे. यापूर्वीच्या अनेक नगररचनाकारांना जेलची हवा खावी लागली असून एक जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात सापडला. तर नगररचनाकार करपे नऊ महिन्यांपासून बेपत्ता आहेत. मुख्यमंत्र्यानी चौकशीचे आदेश दिल्यानंतरही करपे यांचा ठावठिकाणा लागला नसल्याने कुटुंब मानसिक तणावाखाली आहेत. राजकीय दबावामुळे ते प्रतिक्रीया देण्यास धजावत नाही. करपे यांनी एका आठवडयात तब्बल ३८ बांधकाम परवाने दिल्याने वादात सापडले होते. पालिकेने सर्व बांधकाम परवान्यांची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.करपे बेपत्ता झाल्यानंतर विभागाला पूर्णवेळ नगररचनाकार मिळाला नाही. येथे येण्यास कुणीही धजावत नसल्याचे बोलले जाते. विभागाचा कारभार चालविण्यासाठी मिलिंद सोनावणी यांना प्रभारी नगररचनाकारपदाचा पदभार दिला. मात्र ते नावालाच नगररचनाकार असून एकाही बांधकाम परवान्यावर सही केलेली नाही, अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. तत्कालिन नगररचनाकार गुडगुळे यांच्या कालावधीतील ११० बांधकामे परवान्यासह तब्बल २५० पेक्षा जास्त परवाने वादात सापडले. बिल्डरांनी बांधकामे पूर्ण करून त्यातील ९० टक्के बांधकामाची विक्री पूर्णत्वाच्या दाखल्यासह इतर दाखले न घेता केली आहे. नगररचनाकार विभागाचा अंकुश नसल्याने सर्रास वाढीव बांधकामे केली आहेत. तसेच शहरात मोठ्या संख्येने बेकायदा बांधकामही जोरात सुरू असून पालिका निवडणुकीच्याकाळात त्याला अधिक जोर आला होता. (प्रतिनिधी)
नगररचनाकाराविना विभाग ठप्प
By admin | Published: April 19, 2017 12:24 AM