लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरूच आहे. दररोज हजारोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. प्रतिदिन रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ४ ते ५ असले तरी कोरोनाच्या पहिल्या लाटेत काही मृतदेहांची अंत्यसंस्काराविना झालेली हेळसांड पाहता केडीएमसीने दुसऱ्या लाटेत मात्र पुरती खबरदारी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. कोविड मृत रुग्णांचे अंत्यसंस्कार गॅस शवदाहिनीमध्ये करावेत या सरकारी आदेशानुसार मनपाकडून दोन्ही शहरांमध्ये एकूण सहा ठिकाणी गॅस शवदाहिन्यांची सुविधा उपलब्ध केली आहे. यात मनपा हद्दीबाहेरील लगतच्या शहरांतील कोविड मृत रुग्णांचे याठिकाणी हाल होत आहेत.
कोराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण केडीएमसीच्या हद्दीत १४ मार्च रोजी आढळला. लॉकडाऊननंतरचा काही मधला कालावधी वगळता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट देशासह राज्यात आली आहे. यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसाला हजारोंच्या संख्येने वाढत आहे. सोमवारपर्यंतचा आढावा घेता कोरोनाबाधितांचा आकडा ८५ हजार ४९७ पर्यंत पोहोचला आहे. एक हजार २७१ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मागील कोरोनाच्या लाटेत दरदिवशी मृत्यूचे प्रमाण जुलै ते ऑगस्टदरम्यान १० ते ११ होते. दुसऱ्या लाटेत हे प्रमाण दाेन ते चार असे आहे. मागील कालावधीत गॅस शवदाहिन्यांच्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मृतदेहांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड झाली होती. काही ठिकाणी मग लाकडांवर अंत्यसंस्कार उरकून घेण्याची नामुष्की ओढावली होती. कोरोना मृत रुग्णाला प्लास्टिकमध्ये गुंडाळून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जायचे. मृतदेह जळताना ते प्लास्टिक शवदाहिनीच्या पट्ट्यामध्ये अडकून मशीन खराब होण्याचे प्रमाण वारंवार घडत होते. त्यामुळे डोंबिवलीतील रुग्णांचा मृतदेह कल्याणला, तर कल्याणमधील मृतदेह डोंबिवलीला अशी फरपट व्हायची. केडीएमसीच्या हद्दीत ६० स्मशानभूमी, तर सात ठिकाणी दफनभूमी आहेत. दरम्यान, मागचा अनुभव पाहता केडीएमसी यंदा पूर्ण सज्ज झाली आहे. सहा ठिकाणच्या स्मशानभूमींमध्ये शवदाहिनीची सुविधा देण्यात आली आहे. यात कल्याणमधील लालचौकी, बैलबाजार, मुरबाड रोड आणि विठ्ठलवाडी स्मशानभूमी, तर डोंबिवलीतील शिवमंदिर आणि पाथर्ली याठिकाणच्या स्मशानभूमींमध्ये ही सुविधा उभारण्यात आली आहे.
-------------------
कोविड मृत्यूचे प्रमाण
१ एप्रिल ३
२ एप्रिल ३
३ एप्रिल ४
४ एप्रिल ३
५ एप्रिल २
-----------------------
बाहेरील मृत रुग्णांचेही होतात अंत्यसंस्कार
कल्याण-डोंबिवली शहरात मनपाच्या वतीने सहा गॅस शवदाहिन्या उभारल्या असल्या तरी तेथे मनपा हद्दीसह बाहेरील मृत रुग्णांचे अंत्यसंस्कार होत आहेत. डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमीत होणाऱ्या अंत्यसंस्काराचा आढावा घेता, येथे सध्या नैसर्गिक आणि कोविडने मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे दिवसभरात १२ ते १४ अंत्यसंस्कार होत आहेत. शिळफाटा, अंबरनाथ, उल्हासनगर येथील मृतदेहही अंत्यसंस्कारासाठी येथे आणले जातात.
----------------------