पालघर : पालघर नगरपरिषदेच्या वतीने १ हजार ४२ लाभार्थ्यांना शौचालये बांधण्यासाठी कोट्यवधी रु.चा निधी वाटप करूनही नागरिक उघड्यावर शौचाला जात असल्याने पालिकेच्या गुड मॉर्निंग पथकांनी उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालघर नगरपालिकेनेही स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली आहे. पालघर नगरपालिका क्षेत्रातील शौचालय नसलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण करून स्वच्छ भारत योजनेंतर्गत १ हजार ४२ लाभार्थ्यांना शौचालये बांधण्यासाठी आतापर्यंत नगरपालिकेने १ कोटी १५ लाख रु.चे अनुदान वाटप केले आहे. मात्र, तरीही काही लोक बांधलेल्या शौचालयांचा वापर न करता उघड्यावर शौचास बसत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेतर्फे गुड मॉर्निंग पथके स्थापन करण्यात आली. शहरातील वीरेंद्रनगर, घोलवीरा, नवल, वेवुर, बाफना कम्पाउंड, इ. भागांतील नागरिक पहाटे उघड्यावर शौचास जात असताना त्यांना गुलाबाचे फुल देऊन त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. ज्यांच्याकडे खाजगी शौचालये नसतील, त्यांनी सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा व शौचालयांची गरज असणाऱ्या कुटुंबांनी पालिकेकडे अर्ज करण्याचे आवाहन मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी केले आहे. तसेच यापुढे उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर प्रथम दंडात्मक कारवाई म्हणून १०० रु. दंड, त्यानंतर एक हजार रु. दंड व पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचेही मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)
उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना नगरपरिषदेचे ‘गुड मॉर्निंग’
By admin | Published: March 12, 2016 1:55 AM