शहर युवक काँग्रेसची धुरा शेख यांच्याकडे, सरबजित सिंग कार्याध्यक्षपदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 04:07 AM2018-12-24T04:07:58+5:302018-12-24T04:08:26+5:30
ठाणे युवक काँग्रेस शहर (जिल्हा) अध्यक्षपदी लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या मोहम्मद झिया शेख यांच्या नियुक्तीवर शनिवारी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद्र यादव यांनी ई-मेलद्वारे शिक्कामोर्तब केले.
ठाणे - ठाणे युवक काँग्रेस शहर (जिल्हा) अध्यक्षपदी लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या मोहम्मद झिया शेख यांच्या नियुक्तीवर शनिवारी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद्र यादव यांनी ई-मेलद्वारे शिक्कामोर्तब केले. ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांचे समर्थक सरबजित सिंग यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यामुळे शिंदे हरले आणि स्व. पूर्णेकर गट जिंकला, अशी चर्चा ठाणे काँग्रेसमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.
सप्टेंबर महिन्यात ठाणे शहर युवक काँग्रेस अध्यक्षपदासह कार्यकारिणीची लोकशाही पद्धतीने निवडणूक पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी मोहम्मद झिया शेख आणि सरबजित सिंग यांच्यात खऱ्या अर्थाने लढत झाली. या निवडणुकीत झिया जवळपास ५०० मतांनी निवडून आले. निवडणुकीनंतर दीड महिन्याने पराभूत आणि दुसºया क्रमांकाची मते असलेले उमेदवार सरबजित सिंग यांना आॅक्टोबर महिन्यात युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे-पाटील यांनी मुंबई येथे नियुक्तीपत्र देऊन अध्यक्ष म्हणून घोषित केले होते. याचदरम्यान २८ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास झिया शेख यांच्यासह प्रतिभा रघुवंशी, मनीष चौधरी आणि सत्यजित तांबे-पाटील यांना अखिल भारतीय युवक काँग्रेस अध्यक्ष केशवचंद्र यादव यांचा एक मेल आला. शेख यांची शहर (जिल्हा) युवक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येऊन, त्यानुसार पक्षाचे काम करण्याच्या सूचना या ई-मेलमध्ये देण्यात आल्या. काही तासांनी आणखी एक ई-मेल आला. अखिल भारतीय युवक काँग्रेस अध्यक्षांनी तो ई-मेल चुकून पाठवल्याचे त्यात म्हटले होते. त्यानंतर, शेख यांनी आपली बाजू मांडली. त्यावेळी लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शेख यांना दिले होते.
वृत्ताला दिला दुजोरा
झिया शेख यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. सरबजित सिंग यांनीही अखिल भारतीय युवक काँग्रेसचा ई-मेल आला आहे, त्यामध्ये कार्याध्यक्षपदी निवड झाल्याचे म्हटले आहे; मात्र अद्याप अधिकृत पत्र नसल्याची माहिती दिली. यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले.