अनिकेत घमंडी, डोंबिवली कल्याणमधील एका हॉटेलच्या शेडचे अनधिकृत बांधकाम तोडण्यास आमदार गणपत गायकवाड यांच्या विनंतीवरून यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती व आता रस्ता रुंदीकरणाच्या कारवाईत मुख्यमंत्री कार्यालयाकडून हस्तक्षेप केला गेला, अशी चर्चा आहे. त्याचवेळी केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांच्या बदलीची चर्चा सुरु झाल्याने आयुक्तांच्या पाठिंब्याचे व मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील सूर उमटू लागले आहेत.शुक्रवारी कल्याणमधील कारवाई स्थगित झाल्यानंतर शनिवारपासून आयुक्त रवींद्रन यांच्या बदली संदर्भातील मेसेज व्हायरल होऊ लागले. त्यामुळे सर्वसामान्य कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये राज्य शासनाच्या दुटप्पी भूमिकेबाबत तिखट प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. सपोर्ट ई.रवींद्रन असे मेसेज आयुक्तांच्या फोटोसह रविवारी व्हायरल झाले.आठ वर्षांनी महापालिकेला आयएएस दर्जाचा आयुक्त मुख्यमंत्री फडवणीस यांनीच दिला तर मग आता त्यांना काम करु द्या, शहराला शिस्त लावायची असेल तर असे निर्णय घ्यावेच लागतील. फडणवीसांनी आयुक्तांच्या कामात हस्तक्षेप करु नये व रवींद्रन यांना त्यांचा कार्यकाल पूर्ण करु द्यावा, त्यांना शहरे सुधारु द्यावीत. या शहरांना जो बकालपणा आला आहे, त्याला शिस्त लागायलाच हवी, अशा कठोर शब्दांत नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. व्यापाऱ्यांची भेट घेऊन कारवाई रोखण्याकरिता आग्रह धरणारे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचा निषेध व्यक्त केला जात आहे. यापूर्वी कल्याणमधील एका हॉटेलची अनधिकृत शेड हटवण्याच्या मुद्यावरुन आमदार गणपत गायकवाड यांच्या मध्यस्थीमुळे मुख्यमंत्र्यांच्या दालनातून स्थगिती आदेश आला होता. त्यावरुनही बरेच वादंग झाल्यावर त्यांनी तो मागे घेतला. आता मेहतांच्या सांगण्यावरुन अनधिकृत बांधकामावरील कारवाईचा पोलीस बंदोबस्त काढून घेतला गेला. भाजपाच्याच आमदारांसह विभाग अध्यक्ष खासदार कपिल पाटील यांची या संपूर्ण प्रकरणात कात्रीत सापडल्याची स्थिती आहे. आमदार नरेंद्र पवार, आणि खा. पाटील यांनी फडणवीसांच्या या निर्णयाबाबत जाहीर बोलणे टाळले.शिवसेना सध्या कुंपणावर बसून सर्व परिस्थिती पाहत आहे. मनसेची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. शिवसेनेने त्यांची भूमिका स्पष्ट करावी असे, मनसेचे नेते सांगत आहेत. त्याचवेळी दत्तनगर बालमित्र मंडळ या संस्थेने सोमवारी ११ जानेवारी रोजी सकाळपासून रामनगर तिकीट खिडकीपाशी रवींद्रन यांच्या पाठिंब्याकरिता स्वाक्षरी मोहीम राबवण्याचे ठरवले आहे.
आयुक्त रवींद्रन यांच्या पाठिंब्याकरिता नागरिक आग्रही
By admin | Published: January 11, 2016 1:54 AM