अनिकेत घमंडी डोंबिवली : बदलत्या हवामानामुळे सर्दी, पडसे, खोकला आणि श्वसनाच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. मात्र, पावसाळ्याच्या मोसमाच्या तुलनेत डोंबिवलीत डेंग्यू, मलेरियाच्या तापाचे रुग्ण आटोक्यात आल्याचा दावा केडीएमसीच्या पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालय प्रशासनाने केला आहे. शास्त्रीनगर रुग्णालयात शुक्रवारी सकाळी ५०० नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यात श्वसनाच्या आजारांचे रुग्ण सर्वाधिक होते. त्याचबरोबर जुने १५० रुग्ण, महापालिकेचे कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक असे ५० रुग्ण असे सरासरी दिवसाला ७०० रुग्ण औषधोपचाराचा लाभ घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. खाजगी दवाखान्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत.थंडीची चाहूल लागत असतानाच सोमवारी पाऊस पडला. त्यानंतर, दोन दिवस ढगाळ वातावरण होते. हवेतील आर्द्रता वाढल्याने वाढलेल्या उकाड्याचा नागरिकांना सामना करावा लागला. बुधवारी रात्री व गुरुवारी पहाटे गारवा जाणवला. झपाट्याने बदलणाºया हवामानामुळे सर्दीचे रुग्ण वाढले आहेत. त्यातच शहरातील रस्त्यांवरील धूळ आणि प्रदूषण यामुळेही श्वसनाचे विकार होत आहेत. अनेक जण कफ, खोकला, उलट्या अशा आजारांनी बेजार आहेत. लहान मुले व वयोवृद्धांना या आजारांचा त्रास होत आहे.शहरात पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. डोंबिवली पश्चिमेतील काही ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आहेत. मात्र, ही साथ आटोक्यात आल्याचे वैद्यकीय अधिकाºयांचे म्हणणे आहे. डेंग्यूची साथ पसरू नये, यासाठी जागृती सुरू आहे. धूरफवारणीही केली जात आहे. त्यामुळे साथरोगांचे प्रमाण नियंत्रणात आहे. काविळीच्या रुग्णांचे प्रमाणही नसल्याचे सांगण्यात आले.>श्वानदंशाचेही दररोज १० ते १२ रुग्णश्वानदंशाचे दिवसाला १० ते १२ नवे रुग्ण उपाचारासाठी येतात. अधिक उपचार, औषधोपचार व नव्या रुग्णांसह दिवसाला श्वानदंशाचे ५० रुग्ण येतात. रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक ५० लस उपलब्ध होत्या. याखेरीज, साठा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सर्पदंशाचीही लस येथे उपलब्ध आहे.डोंबिवली शहरात डेंग्यूची साथ आटोक्यात आली आहे. चार दिवसांत सर्दी-पडसे, श्वसनाच्या विकारांचे रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी आले आहेत. दिवसाला ७०० रुग्ण हे नित्याचे आहेत.- राजू लवंगारे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, शास्त्रीनगर रुग्णालय, केडीएमसी
पुन्हा वाढले साथीचे रूग्ण, डेंग्यू, मलेरिया आटोक्यात आल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 3:05 AM