अजित मांडके, प्रतिनिधी
लोकसभा, विधानसभा निवडणुकीआधीच होणाऱ्या कोकण पदवीधर निवडणुकीमध्ये आता रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. मागील दोन वर्षांत राज्यात बदललेल्या सत्ता समीकरणानंतर ही निवडणूक भाजपला सोपी जाईल, असेच चित्र आहे. लोकसभेची जागा आपल्याला मिळावी, म्हणून शिवसेनेने कोकण पदवीधरवर दावा केला आहे. तिकडे राष्ट्रवादी अजित पवार गटानेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुतीमध्ये कोकण पदवीधरवरून रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, या मतदारसंघातून विधान परिषदेवर गेलेले निरंजन डावखरे यांना विजयी करण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा विश्वास भाजपचे नेते व्यक्त करत आहेत.
सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व निरंजन डावखरे करत आहेत. नितेश राणे या मतदारसंघातून उभे राहणार अशा बातम्या आल्या. मात्र, नितेश राणे यांनी स्वत:च त्याचे खंडण केले. डावखरे यांनी मतदारसंघ बांधून ठेवल्यामुळे भाजपकडून त्यांची उमेदवारी निश्चित आहे. शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटानेही या निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे. प्रत्येक पक्षाकडून अनेक नावे चर्चेत असून, इच्छुकांनी नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी कोकणातील टोकापासून ठाण्यापर्यंत धावाधाव सुरू केली आहे. केवळ दबाव टाकण्यासाठी काहींनी कोकण पदवीधर निवडणुकीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघाची मागील निवडणूक २०१८ मध्ये झाली होती. त्यावेळेस भाजप विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी असा तिरंगी सामना झाला होता. त्यात भाजपचे निरंजन डावखरे हे विजयी झाले होते. शिवसेनेचे संजय मोरे यांचा पराभव झाला होता तर राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. ठाणे आणि कल्याण लोकसभेवरून शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. भाजपने या दोन्ही मतदारसंघांवर दावा केला आहे. परंतु, हे दोन्ही शिवसेनेचे गड होते आणि राहणार, असा दावा शिंदे गटाकडून केला गेला आहे. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, या न्यायाने भाजपकडून दोन्ही लोकसभा मतदारसंघ खेचून घेण्याकरिता शिवसेनेने पदवीधरवर दावा केला. राष्ट्रवादी अजित पवार गटालाही ठाणे जिल्ह्यात पाय रोवायचा आहे. त्यामुळे त्यांचीही मतदार नोंदणी सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून खासदार राजन विचारे यांच्या कन्या धनश्री विचारे, संजय घाडीगावकर आणि केदार दिघे यांची नावे चर्चेत आहेत. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक अमित सरय्या यांचे नाव पुढे आले आहे. राज्यात तीन पक्षांचे सत्ताधारी व तेवढ्याच पक्षांचे विरोधक आहेत. आपापले राजकीय अस्तित्व टिकविण्याकरिता व विस्तारण्याकरिता प्रयत्न करताना त्यांना महायुती व महाआघाडीचे अस्तित्व टिकविण्याची तारेवरची कसरत करायची आहे.
मतदारांचा निरुत्साह
ठाणे जिल्ह्यात सुशिक्षित पदवीधरांची संख्या मोठी आहे. मात्र, पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत मतदार म्हणून नोंदणी करण्यातील पदवीधरांचा उत्साह फारच तोकडा आहे. साहजिकच राजकीय पक्ष त्यांच्या विचारांच्या पदवीधरांना मतदार म्हणून नोंदवतात व आपले मतदान मिळवून निवडणूक खिशात घालण्याचा प्रयत्न करतात. खरोखर जर जिल्ह्यातील पदवीधरांनी उत्स्फूर्तपणे नावनोंदणी केली तर पदवीधर या नात्याने मतदारांचा रेटा निर्माण करण्यात यश येईल.