अंबरनाथ : येथील आॅर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने २०० रिव्हॉल्वर विकणाऱ्या टोळीला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. पंजाब येथील फिरोजपूर जिल्हा न्यायाधिशांची बनावट स्वाक्षरीने परवानगी पत्र आणि बनावट एनओसी या टोळीने तयार केले होते. या बनावट कागदपत्रे आणि फॅक्ट्रीतील क्लार्कच्या मदतीने या टोळींचा सुरु असलेला धंदा पंजाब आणि अंबरनाथच्या पोलिसांनी उघडकीस आणून यातील आरोपींना अटक केली आहे.२००६ ते २००८ या दोन वर्षांत पंजाबच्या फिरोजपूर येथील गुरुहर सहाय आणि दिनेश पलटा यांनी बनावट कागद परवानगी पत्रांद्वारे अंबरनाथच्या आॅर्डनन्स फॅक्टरीमधून तब्बल २०० रिव्हॉल्वर मिळवून त्या इतर ठिकाणी विकल्याने त्यांच्या विरोधात फिरोजपूर येथील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी गुरुहर आणि दिनेश याला अटक केली असून त्यांना या कामात अंबरनाथ आॅर्डनन्स फॅक्टरीमधील एम. मणीयार मदत करत असल्याचे निष्पन्न झाल्याने पंजाबच्या छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतार सिंग आणि त्यांच्या टीमने अंबरनाथमधून त्याला अटक केली. या प्रक्रीयेत अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्यांना सकारात्मक मदत केल्याने त्यांनी अंबरनाथ पोलिसांचे आभार मानले. वाममार्गाने रिव्हॉल्वर मिळविण्याच्या या कामात इतर काही नावे समोर येण्याची शक्यता असून यामध्ये मोठी टोळी सहभागी असण्याची शक्यता छावणी पोलिसांनी व्यक्त केली आहे.
आॅर्डनन्समधील २०० रिव्हॉल्व्हर विकणाऱ्या क्लार्कला अटक
By admin | Published: July 07, 2015 11:51 PM