बदलापूर : नव्याने उभ्या राहिलेल्या गृहसंकुलांमध्ये केबल वाहिन्या टाकण्यासाठी सुरू असलेल्या स्पर्धेतून बदलापूरमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बदलापूर पश्चिमेतील वालिवली भागात असलेल्या जलाराम सोसायटीत हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन्ही गटातील १२ जणांवर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे यात शिवसेना आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, सहा जणांना अटक केली आहे.
बदलापूर पश्चिमेतील वालिवली येथील जलाराम सोसायटीत भगवान म्हसकर याने केबल वाहिन्या टाकल्यानंतर त्यास रोहन म्हसकर याने विरोध केल्याने भगवान म्हसकर, प्रसाद म्हसकर, ज्ञानेश्वर म्हसकर आणि गिरीश म्हसकर यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप रोहन याने केला आहे. तर, केबलजोडणी दिल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणानंतर घरी जात असताना सोसायटीच्या आवारातच बंटी ऊर्फ तेजस म्हसकर, राजाराम म्हसकर, चंद्रकांत म्हसकर, रोहन म्हसकर, श्रीनाथ म्हसकर, योगेश म्हसकर, पंकज म्हसकर, स्वप्नील भगत यांनी भगवान म्हसकर यास मारहाण केल्याचा आरोप प्रसाद म्हसकर यांनी आपल्या तक्र ारीत केला आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर प्रसाद म्हसकर आणि रोहन म्हसकर यांच्या परस्परविरोधी तक्र ारींवरून बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या हाणामारीच्या प्रकरणातील सहा आरोपींना अटक करण्यात आले असल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी दिली आहे.धक्कादायक म्हणजे या हाणामारीच्या प्रकरणातील आरोपी हे शिवसेना पक्षाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. यातील प्रसाद युवासेना शहर अधिकारी, तेजस युवासेना बदलापूर सचिव, तर इतरही आरोपी शिवसेना किंवा युवासेनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.