मीरारोड - मीरा भाईंदर मेट्रोच्या काशिगाव स्थानकाच्या पायऱ्या अस्तित्वातील नाल्यावर उतरण्याचं काम माजी आमदारांनी बंद पाडल्याचा आरोपांवरून आजी - माजी आमदारांमध्ये आरोप व प्रत्यारोप होत असतानाच त्यावरून टीकेची झोड उठली आहे.
मीरा भाईंदर मेट्रोच्या कामापैकी दहिसर ते काशिगाव मेट्रो ही पहिल्या टप्प्यात डिसेंबर २०२४ मध्ये सुरू करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यातही काशिगाव मेट्रो स्थानकचे काम मीरारोडच्या प्लेझन्ट पार्क येथे सुरू आहे. परंतु स्थानकातून खाली जिना नाल्यावर उतरवण्याचे काम जागेच्या वादातून सातत्याने बंद पाडलं जात असल्याचं पत्र एमएमआरडीएने पालिकेला दिलं आहे.
वास्तविक सदर १३३ चौ. मी. जागा ही मेट्रो जिने बांधकामासाठी लागणार असून त्या जागेचा पैश्यांच्या स्वरूपात मोबदला माजी भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या ७११ कन्स्ट्रक्शन कंपनीने मागितला आहे. त्यामुळे येथील मेट्रो स्थानकाच्या जिन्यांचं काम बंद पाडलं गेलं आहे.
सदर मेट्रोसाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही महापालिकेची असून पालिका जागेच्या मोबदल्यात टीडीआर देतं. कारण रोख वा पैशांच्या रूपात मोबदला देणं पालिकेला परवडणारं नसल्याने पूर्वीपासून टीडीआर दिला जातोय. परंतु मेहतांच्या कंपनीने आर्थिक मोबदला मागितल्याने मेट्रोचे काम बारगळले असून पालिकेने भूसंपादनासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव विलंबाने पाठवला आहे.
माजी आमदारांच्या कंपनीने ३ वेळा मेट्रोचं काम बंद पाडल्याचं सांगत मेहतांना मेट्रो होऊ द्यायची नाही असेच दिसत आहे. आपली जमीन असती तर मेट्रोचे काम टीडीआर ऐवजी पैसे मागून अडवले नसते असे आमदार गीता जैन यांनी म्हटलं. याआधी भाईंदर पश्चिमेच्या तोदिवाडी येथील मेट्रोचे काम देखील मेहतांच्या कंपनीने २०२० साली अनेकदा बंद पाडले होते हे जनता विसरलेली नाही असं जैन म्हणाल्या.
जैन यांना प्रत्युत्तर देत नरेंद्र मेहता यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं की, आम्ही जमीन द्यायला तयार असून तशी पत्रं दिली आहेत. परंतु ते पैसे द्यायला व जमीन घ्यायला तयार नाहीत. जैन यांनी घरचं काम करावं. त्यांना अक्कल नाही, काहीही आरोप करतात. त्या एक्सीडेंटल आमदार आहेत अश्या प्रकारची जहरी टीका मेहतांनी केली.
मेट्रोचे काम मेहतांच्या कंपनीने याआधी देखील बंद पाडले होते. लोकांनी मेहतांना त्यांच्या भ्रष्टाचार मी गुन्हेगारी वृत्ती आणि मनमानीमुळे पाडले म्हणून मेहता हे मेट्रोचे काम, पाण्याच्या टाकीचे काम बंद पाडायला लावतात व विकास कामांवर सूड उगवतात असा आरोप सामाजिक कार्यकर्ते रोहित सुवर्णा यांनी केला.
काशिगाव मेट्रो स्थानकचा जिना महापालिकेच्या सार्वजनिक गटारावर होणार असताना व सदर जागा २० वर्षां पासून जास्त काळ पालिकेच्या सार्वजनिक वापरात असताना मेहता यांची कंपनी मेट्रोचे काम बंद कसे पाडू शकते? पालिकेने पोलीस बंदोबस्तात हे काम पूर्ण केले पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजीव मेहरा यांनी केली.
सामान्य नागरिकांच्या जागेत पालिकेने पोलीस बंदोबस्तात दादागिरीने बांधकामे तोडून कामे केली गेली आहेत. पण येथे मात्र मेहतांची कंपनी असल्याने महापालिका त्यांच्यासमोर शेपूट घालून मुजरा घालत आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ऍड. विक्रम तारे पाटील यांनी केली आहे.