ठाणे : ठाण्यात शिवसेनेच्या शिंदे गटाने शिवाईनगर येथील शाखा कुलूप तोडून ताब्यात घेतली. त्यानंतर ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या. दोन्ही गटांना पांगविण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. दोन्ही गटांकडून शाखेसाठी दावा केला जात असल्यामुळे येथे राज्य राखीव पोलिस दलाची कुमक तैनात करण्यात आली आहे.
राज्यभरात होळीचा उत्साह साजरा होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच सोमवारी अनपेक्षित घडामोडी सुरू होत्या. शिवाईनगर येथील जुन्या शिवसेना शाखेचा ताबा घेण्यासाठी शिंदे गटाचे कार्यकर्ते हे साेमवारी रात्री ८ वाजता पोहाेचले होते. त्यानंतर दोन्ही गटांचे कार्यकर्ते हे एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी करीत आमने-सामने आले. शिंदे गटाने शाखेचा ताबा घेतल्यानंतर शाखेतच तळ ठोकला. त्यावेळी ठाकरे गटातील भास्कर शेट्टी यांच्यासह कार्यकर्ते घोषणा देत होते, तर दुसरीकडे शिंदे गटातील माजी नगरसेवक जेरी डेव्हिड यांच्यासह कार्यकर्ते घोषणा देत होते. तणाव वाढत असताना वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सदाशिव निकम यांनी दोन्ही गटांना तिथून जाण्याचे आवाहन केले.
फटाक्यांची आतषबाजी आणि बाचाबाचीस्थानिक शिवसैनिक असताना शिंदे गटाने टाळा तोडून शाखा ताब्यात घेतली. सर्वोच्च न्यायालयाचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही अवमान केल्याचा आरोप ठाकरे गटाचे भास्कर शेट्टी यांनी केला, तर ही शाखा प्रताप सरनाईक यांनी बांधलेली असून, येथील स्थानिक पदाधिकारी आमच्यासाेबत आहेत, असा दावा शिंदे गटाच्या नरेश म्हस्के यांनी केला. शाखा ताब्यात आल्यानंतर शिंदे गटाने फटाक्यांची आतषबाजी केली. रात्री ११ च्या दरम्यान दोन्ही गटांना पोलिसांनी पांगविल्यानंतर या वादावर पडदा पडला. दरम्यान, याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.