घरगुती गणेशोत्सवात साकारली क्लस्टरविरोधाची आरास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 03:16 AM2018-09-22T03:16:09+5:302018-09-22T03:16:57+5:30
गणेशोत्सवाची धूम सर्वत्र सुरू असताना लाडक्या बाप्पासाठी भाविकांनी केलेल्या आगळ्यावेगळ्या सजावटी लक्ष वेधून घेत आहेत.
ठाणे : गणेशोत्सवाची धूम सर्वत्र सुरू असताना लाडक्या बाप्पासाठी भाविकांनी केलेल्या आगळ्यावेगळ्या सजावटी लक्ष वेधून घेत आहेत. मात्र गावठाण, कोळीवाडे संवर्धन समितीने सुरू केलेल्या क्लस्टर योजनेच्या विरोधाचे पडसाद यंदाच्या गणेशोत्सव सजावटीमध्ये उमटले आहेत.
ठाण्यातील राबोडी-कोळीवाडा गावठाण संघाचे अध्यक्ष तथा कोळीवाडा-गावठाण संवर्धन समितीचे सदस्य चंद्रकांत वैती व महेश वैती यांनी आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षातील घरगुती गणेशोत्सवात क्लस्टरविरोधाची सजावट केली आहे. विशेष म्हणजे, सजावटीतील होडी वल्हवणारा नाखवा आदी सर्व बाबी साकारण्यासाठी पर्यावरणपूरक बाबींचा वापर केला असून १० दिवसांनंतर जसे गणपती आपल्या गावी जातील तसेच क्लस्टर योजना रेटून नेणाऱ्या नेत्यांनाही या प्रतीकात्मक होडीतून गावी पाठवण्याचा अर्थात त्यांचे विसर्जन करण्याचा इशारा देखाव्याद्वारे दिला आहे.
ठाण्यातील क्लस्टर योजनेतून कोळीवाडे आणि गावठाणे वगळून मुंबईच्या धर्तीवर स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तरीही, ठाण्यातील कोळीवाड्यांमधील रहिवाशांचा क्लस्टरच्या जनसुनावणीचा फेरा कायम ठेवला. शहराच्या नियोजन आराखड्यामध्ये चेंदणी कोळीवाडा यांचा उल्लेख नाही. कोळीवाड्यांचे सीमांकन करून गावठाणांना क्लस्टरमधून वगळावे, अशी मागणी करूनही शहर विकास विभाग आणि सत्ताधारी शिवसेना दखल घेत नसल्याने कोळीबांधव आणि भूमिपुत्रांनी यापूर्वी दहीहंडीदिनी गोविंदा पथकांकडून शहरभर क्लस्टरविरोधाची हाक दिली होती.
>गणेशोत्सवाच्या सजावटीत फलकांवरील घोषणा
क्लस्टरला विरोध गावासाठी... आपल्या
गावच्या गावपणासाठी
क्लस्टर ठाण्याला लागलेले नष्टर
कोळीवाडे गावठाण कायमस्वरूपी
क्लस्टरमुक्त करा
कोळीवाडे, गावठाण व ठाणेकरांना क्लस्टरविरुद्ध लढून स्वातंत्र्य कोण मिळवून देणार...
उत्तर एकच भूमिपुत्र
ठाण्यातील कोळीवाड्यांना क्लस्टरमधून वगळण्याची घोषणा झाली असतानाही नागरिकांना विनाकारण बोलावून त्यांच्या सूचना आणि हरकती ऐकून घेण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. सुनावणीसाठी बोलावल्यानंतर भूमिपुत्रांच्या मुद्यांची दखल घेतली जात नाही. तेव्हा, सनदशीर मार्गाने आंदोलन छेडत असतानाच पारंपरिक उत्सवातूनही भूमिपुत्रांनी क्लस्टरविरोधाचे बिगुल वाजवले आहे.
- गिरीश साळगावकर, कोळीवाडा गावठाण समिती