ठाणे: आपल्या मैत्रिणीशी का बोलला? असा जाब विचारत वर्तकनगर येथील एका शाळेतील दहावीतील रोहन अंबुरे (१५, रा. ज्ञानेश्वरनगर, ठाणे) या विद्याथ्यार्वर चाकूने खुनी हल्ला केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी बारावीतील १७ वर्षाच्या हल्लेखाेरास ताब्यात घेतल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.
रोहन हा वर्तकनगर येथील ब्राह्मण विद्यालयात दहावीमध्ये शिकतो. दहावीच्या इंग्रजी विषयाचा चाचणी परीक्षेचा पेपर देऊन तो शाळेबाहेर पडला होता. त्याचवेळी साधारण सकाळी १०.३० ते ११ च्या सुमारास त्याला अन्य कनिष्ठ महाविद्यालयात बारावीमध्ये शिकणाऱ्या अमित पावडे (नावात बदल) आणि त्याच्या दाेन ते तीन मित्रांनी जानकादेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर गाठले. त्याच्या मैत्रिणीचे नाव घेत तिच्याशी का बोलतोस? असा अमितने रोहनला जाब विचारला. तेंव्हा रोहनने आपण तिच्याशी बोलत नसल्याचा खुलासाही केला.
मात्र, एवढयावरच समाधान न मानता अमितने त्याच्याकडील चाकूने रोहनच्या पाठीवर दोन आणि पोटावर तीन वार केले. त्यावेळी अमितच्या मित्रांनीही त्याला या हल्ल्यासाठी मदत केली. यात रक्तबंबाळ अवस्थेतच रोहन जीव वाचविण्यासाठी ओरडत होता. त्यानंतर अमितसह तिघेही तिथून पसार झाले. या घटनेनंतर अमितने त्याचा बारावी परीक्षेच्या चाचणीचा पेपरही दिला.
दरम्यान, रोहनला एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष गायकर यांनी दिली. परीक्षा झाल्यानंतर अमित याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या अन्यही साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.