ठाणे : ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी ठेवलेल्या एका डब्यात ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-६च्या कॅन्टीनवरील एक कर्मचारी चहाचे क प धूत असल्याचा व्हिडीओ शुक्रवारी व्हायरल झाला. या घटनेची ठाणे रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन संबंधित कॅन्टीनधारकाकडून लेखी खुलासा मागितला असून एक लाख रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
दुसरीकडे या संतापजनक प्रकारामुळे प्रवाशांनीही नाराजी व्यक्त करून लिंबूसरबतपाठोपाठ रेल्वे स्थानकातील चहावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज सात ते आठ लाखांच्या जवळपास प्रवासी ये-जा करतात. त्यातच, या रेल्वे स्थानकात १ ते १० या फलाटांवर एकूण १८ उपाहारगृहे (कॅन्टीन) आणि एक फूड प्लाझा आहे. यामध्ये फलाट क्रमांक-५ आणि ६ या ठिकाणी तीन कॅन्टीन असून ते गुप्ता ब्रदर्स नामक ठेकेदाराला चालविण्यासाठी दिले आहेत.
त्यातील एका कॅन्टीनवरील कर्मचारी विजयकुमार कौल हा शुक्रवारी सकाळच्या सुमारास कचºयाच्या डब्यात चहाचे कप आणि कॅन्टीनमधील कपडे धुतानाचा प्रकार मंदार अभ्यंकर नामक एका प्रवाशाने मोबाइलमध्ये चित्रित केला. त्यानंतर तो व्हिडीओ काही क्षणांत व्हायरल झाल्यावर रेल्वे प्रशासन झोपेतून खडबडून जागे झाले.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे रेल्वे प्रशासनाने त्या फलाटावर जाऊन तेथे पाहणी केली. त्या वेळी कॅन्टीनधारकाने कचºयाचा तो डबा चांगला धुऊन घेतला होता. तसेच त्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन ते चहाचे कप धुतले जात होते, असे सांगितले. मात्र, त्यानंतरही रेल्वेने त्याला पत्र देऊन झाल्या प्रकाराचा तातडीने खुलासा मागितला आहे. त्यातच, मुंबई रेल्वे प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती वरिष्ठ अधिकाºयाने दिली. या घटनेमुळे लोकलने प्रवास करणा-या लाखो प्रवाशांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, अशी घटना पुन्हा होऊ नये म्हणून कडक उपाययोजना करण्याची गरज आहे.लिंबूसरबतापाठोपाठ आता चहाचे कप कचºयाच्या डब्यात धुतल्याने कॅन्टीनमध्ये प्रवाशांच्या जीवाशी रेल्वे प्रशासन खेळत असल्याचे दिसून येते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने योग्य ती कारवाई लवकर करावी.- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष,ठाणे रेल्वे प्रवासी संघटना
असे प्रकार वारंवार होत असतील, तर ते हानिकारक आणि धोकादायक आहे. एकीकडे रेल्वे प्रशासन वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. त्याचप्रमाणे या कॅन्टीनधारकांना स्वच्छतेबाबत प्रशिक्षण देण्याची गरज आहे. कॅन्टीनवर काम करणारे बहुतांश कर्मचारी हे परराज्यांतील असल्याने हे प्रकार घातक आहेत. त्यामुळे त्यालाही वेळीच आळा घालणे गरजेचे आहे.- हिरालाल सोनावले, प्रवासी, ठाणे