मीरारोड:- भाईंदर पश्विमेच्या चौक येथील समुद्र किनारी असलेल्या धारावी किल्ल्याची गडप्रेमीकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमे दरम्यान किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या सापडल्याने दुर्गप्रेमीनी संताप व्यक्त करत प्रशासनाने या ठिकाणी किल्ल्याचे पावित्र्य राखण्यासाठी सुरक्षेची जबाबदारी घ्यावी अशी मागणी केली आहे .
भाईंदर पश्विम येथील चौक डोंगरावर अर्धवट अवस्थेतील धारावी किल्ल्याचे चिमाजी अप्पांनी वसई किल्ल्यावर मिळवलेल्या विजयामध्ये मोठे योगदान आहे. वसई किल्ला हा चौकच्या डोंगरा समोर असल्याने पोर्तुगिजांची जलमार्गाने येणारी रसद तोडण्यासाठी तसेच वसई किल्ल्यावर हल्ला चढवण्यासाठी चिमाजी अप्पांनी धारावी किल्ल्याचा वापर केला होता.
पुरातत्व विभाग , जिल्हा प्रशासन, स्थानिक महापालिका प्रशासनासह पोलीस व राजकारण्यांच्या दुर्लक्षामुळे या किल्ल्याची दुरावस्था झाली आहे. या किल्ल्याच्या वरच्या भागात पालिकेकडून सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. किल्याचा बुरुज व भिंतींचे अनेक ठिकाणी नुकसान केले गेले आहे . सदर किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व पाहता त्याचे पुनर्निर्माण करण्याची मागणी दुर्गप्रेमींनी सातत्याने चालवली आहे.
पालिकेने चिमाजी अप्पांचा अश्वारूढ पुतळा उभारून उद्यान विकसित केले असले तरी किल्ल्याचा परिसर , भिंती , पायवाटा आदी देखील साफसफाई करून विकसित करणे आवश्यक आहे . या ठिकाणी दारुड्यांची मोठी जत्रा भारत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासह सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी आहे. दुर्गप्रेमींनी किल्ल्याची साफसफाई करून येथील कचरा , दारूच्या बाटल्या , वाढलेली झुडपे आदी काढून किल्ला स्वच्छ केला . धारावी किल्ल्याच्या साफसफाईची मोहीम नियमितपणे राबवली जात असल्याचे दुर्गप्रेमींनी सांगितले.