ठाणे : पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईअंतर्गत ठाणे महापालिकेने खाडीच्या छोट्या प्रवाहातील गाळही साफ करण्याचा निर्णय घेतला आहे. भरती आणि ओहोटीचे वेळापत्रक बघूनच ही सफाई केली जाणार असून नालेसफाईसाठी ९ कोटी, तर खाडीसफाईसाठी वेगळी २५ लाखांची तरतूद करण्यात येणार आहे. नालेसफाईबरोबरच हे कामदेखील १ मे रोजी सुरू करून ३१ मे पर्यंत संपवण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा विभागाने दिली आहे. खाडीचा प्रवाह साफ करण्याचा पहिलाच प्रयोग महापालिका राबवत आहे. शहरात ११९ किमीचे ३०६ नाले असून यामध्ये १३ मोठे आहेत. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली जाते. मात्र, यावर्षी केवळ नालेसफाईच नव्हे, तर खाडीचा प्रवाहदेखील साफ केला जाणार आहे. शहरातील पाचसहा ठिकाणी असे खाडीचे प्रवाह आहेत, जे नाल्यांना जोडले आहेत. पूर्वी केवळ खाडीकिनारी असलेल्या नाल्यांचे मुख महापालिकेच्या वतीने साफ केले जात होते. मात्र, खाडीपर्यंत जाणारा खाडीचा संपूर्ण प्रवाह साफ न झाल्याने मुख साफ करूनही या प्रवाहामार्गे कचरा नाल्यामध्ये येत होता. यामुळे तोदेखील साफ करणार असून यासाठी भरती ओहोटीच्या वेळापत्रकाचा अभ्यास केला जाणार आहे. भरतीच्या वेळी हे प्रवाह साफ करणे शक्य नसल्याने या वेळापत्रकावरच प्रवाहाची सफाई करणे शक्य असल्याचे घनकचरा विभागाने स्पष्ट केले आहे. ओहोटी येईल, त्या वेळी खाडीचे जेथे स्रोत असतील, त्या ठिकाणी मशीनद्वारे खाडीतील गाळ साफ करणार आहे. नौपाड्यातील ठाणा कॉलेज, रेल्वेनजीकचा खाडीचा प्रवाह, उथळसरजवळील वृंदावन तसेच राबोडी येथील कत्तलखाना आणि कळवा कारशेड खाडीतून येणाऱ्या प्रवाहाची सफाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
नाल्यांसह खाडीचीही साफसफाई
By admin | Published: May 01, 2017 6:12 AM