उल्हासनगर: भारत स्वच्छता अभियान अंतर्गत महापालिकेच्या वतीने सोमवारी शहरातून स्वच्छता जनजागृती रैली काढण्यात आली. यावेळी एसएसटी महाविद्यालयाच्या मुलांनी जनजागृतीवर पदनाट्य सादर केले.
उल्हासनगर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी महापालिकेच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. भारत स्वच्छता अभियान अंतर्गत शहर कचरा मुक्त होण्यासाठी सोमवारी जनजागृती रॅलीचे आयोजन शहरातून करण्यात आले. रैलीत सफाई कामगार, कोणार्क कंपनीचे कचरा गोळा करणारे कामगार, एसएसटी महाविद्यालयाचे तरुण-तरुणी, महापालिका अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कॉलेजच्या मुलांनी स्वछता बाबत पदनाट्य सादर करून स्वच्छतेचा संदेश दिला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी रैलीतील मुलांना प्रोत्साहन देऊन स्वछता रैलीचे कौतुक केले. शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी नागरिकांनी पुढे यायला हवे. नागरिकांनी घरात निर्माण होणारा ओला व सुका कचरा वेगवेगळा करावा. असे आवाहन त्यांनी केले.
शहरात एकीकडे स्वच्छते बाबत रैली निघत असतांना, दुसरीकडे कचरा उचलणारा ठेकेदार अटी व शर्तीचा भंग करून उघड्या डंपर व तुटलेल्या गाड्यातून कचऱ्याची वाहतूक करीत असल्याचे चित्र आहे. असा डंपर व गाड्यातून वाहून नेण्यात येणारा कचरा रस्त्यात खाली पडत असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. तसेच बहुतांश कचरा कुंड्या कचऱ्याने ओसंडून वाहत असल्याचे अस्वच्छ चित्र शहरात आहे. स्वच्छता जनजागृती रैली काढण्यापूर्वी महापालिकेने शहर कचरा मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावा. अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे. कचरा उचलण्यावर महापालिका वर्षाला १८ कोटी पेक्षा जास्त खर्च करूनही शहरात कचऱ्यापासून दुर्गंधी येत आहे. हे चित्र बदलण्याची मागणी राजकीय पक्षाचे नेते वारंवार महापालिकेकडे करीत आहेत.