लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये आज स्वच्छतेचा उत्सवच साजरा झाला . शहरात सुमारे १०० ठिकाणी श्रमदान करून स्वच्छता करण्यात आली . विद्यार्थी व नागरिकांसह सेलिब्रिटी , लोकप्रतिनिधी , राजकारणी , महापालिका व पोलीस प्रशासन , संस्था आदींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
मीरा भाईंदर महापालिकेने आयुक्त संजय काटकर यांच्या नेतृत्वाखाली सुरवातीला २९ प्रमुख ठिकाणे १ ऑक्टोबर रोजीच्या स्वच्छता मोहिमेसाठी निश्चित केली होती . मात्र वाढता प्रतिसाद पाहता सुमारे १०० इतक्या ठिकाणी हि मोहीम राबवण्यात आली . साडेचौदा हजार लोकांनी ऑनलाईन नोंदणी केली होती तर प्रत्यक्षात जास्त लोकांनी सहभाग घेतला . ३१ संस्था मोहिमेत सहभागी झाल्या . शहरातून सुमारे २० टन इतका कचरा गोळ्या करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे यांनी दिली .
आमदार गीता जैन, स्वच्छ मिरा भाईंदर शहराचे ब्रँड ॲम्बेसेडर अभिनेत्री प्रिया मराठे, दिपिका सिंह, अभिनेता शंतनु मोघे यांनी देखील श्रमदान केले. शहरातील जास्त कचरा होणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन ते ठिकाण पूर्णतः स्वच्छ करण्यात आले. वोक्हार्ड रुग्णालया तर्फे १०२१ सायकल स्वारांची रॅली काढण्यात आली. रॅली नंतर जवळ्पास ३०० सायकल पटूंनी मोहिमेत सहभाग नोंदवला असे उपायुक्त रवी पवार म्हणाले.
भाईंदर पूर्वेच्या जेसलपार्क व आरएनपी पार्क कोळीवाडा ह्या खाडी किनारी कांदळवन क्षेत्रात स्वच्छता अभियान राबवण्यात आले . खाडी व कांदळवन मधील चिखलात उतरून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक , कपडे आदी कचरा काढून परिसर स्वच्छ करण्यात आला . निवृत्त पालिका अधिकारी विजय पाटील , कृष्णा गुप्ता , सचिन जांभळे, ऍड. अनिल यादव , सचिन पोपळे , मनोज राणे, जितेंद्र पाठक , वैशाली येरुणकर ,सुहास सावंत , रुची मोरे , कविता वायंगणकर, नंदू जाधव , भावेश पाटील , योगेश पाटील , हितेंद्र आचार्य , नामदेव काशीद, इरफान पठाण, ममता मोरायस आणि त्यांच्या शाळेचे विद्यार्थी , देविदास सावंत , आदींसह अनेक नागरिक ह्यात सहभागी झाले होते . विविध राजकीय पक्ष , संस्था चे कार्यकर्ते एकत्र आले होते .
वेलंकनी आणि उत्तन समुद्र किनारी तसेच घोडबंदर आणि धारावी किल्ला येथे सुद्धा सफाई मोहीम राबवण्यात आली . मोहिमेत सहभागी होणाऱ्या नागरीकांना हातमोजे , खराटे, पंजा, घमेले इत्यादी साहित्य पालिकेने उपलब्ध करून दिले . अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर , उपायुक्त संजय शिंदे , कल्पिता पिंपळे , मारुती गायकवाड , शहर अभियंता दीपक खांबित सह पालिकेचे अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला .