- अनिकेत घमंडी डोंबिवली : केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता सर्वेक्षण समितीचे पथक डोंबिवलीत दाखल झाले आहे. केडीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या विविध विभागांमध्ये या पथकाने शुक्रवारी पाहणी केली. अत्यंत गोपनीय पद्धतीने हे सर्वेक्षण करण्यात येत असून यामध्ये कल्याण-डोंबिवली हागणदारीमुक्त शहरे आहेत की नाहीत, याबाबत पाहणी करण्यात आली.अस्वच्छतेची सर्वात मोठी समस्या असलेल्या या दोन शहरांमध्ये केंद्राच्या निकषानुसार पाहणी करण्यात आली. या पथकातील अधिकारी मयूर सोमवंशी यांच्यासोबत केडीएमसीचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी विलास जोशी, अभियंते राजू नासर हेदेखील दिवसभर होते. त्यांनी सकाळी १०.१५ वाजल्यापासून संध्याकाळी उशिरापर्यंत नऊ ठिकाणी पाहणी केली. यामध्ये प्रामुख्याने शौचालयांची सुविधा आहे का? यावर विशेष भर देण्यात आला. उघड्यावर शौचाला जाण्याचे प्रमाण किती आहे? नाही याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेण्यात आली.डोंबिवलीमध्ये त्यांनी फतेह अली रोडवरील महापालिकेची हिंदी शाळा, तसेच महात्मा ज्योतिबा फुले शाळा, आजदे गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या स्वच्छतागृहाची पाहणी केली. तसेच शास्त्रीनगर रुग्णालयातील शौचालय, मोहने येथील स्वच्छतागृहेही तपासली. कल्याण पश्चिमेकडील बिर्ला महाविद्यालयानजीकचा इंदिरानगर झोपडपट्टी भाग आणि मोहन्यातील महात्मा फुलेनगर भागातील स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांनी पाहणी केली.हागणदारीमुक्त भारतासाठी बंदिस्त शौचालयांची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांनी विशेष प्रयत्न करणे, जनजागृती करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले होते. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली आहे की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी समिती आली आहे. शनिवारीही विविध ठिकाणी पाहणी करण्यात येणार आहे. शनिवारी कुठे पाहणी करणार, याबाबतची माहिती मात्र आताच सांगता येणार नाही. सर्व माहिती केंद्रांतून संबंधित अधिकाºयांना मिळेल. त्यानुसार ते पाहणी करणार असल्याची माहिती जोशी यांनी दिली. तसेच शुक्रवारी केलेल्या पाहणीत ते शौचालयांच्या स्वच्छतेवर समाधानी असल्याचे सांगण्यात आले.दौऱ्याबाबत कमालीची गुप्ततासमिती अधिकारी डोंबिवलीमधील बाजीप्रभू चौकानजीकच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाची पाहणी करणार होते. पण ते तेथे गेले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, तेथील स्वच्छतागृह पाण्याआभावी बंद होते. जर ते तेथे गेले असते तर सार्वजनिक स्वच्छतागृह कुलूप बंद असल्याचे उघडकीस आले असते. माहिती घेतली असता तेथील पाण्याचे कनेक्शन तांत्रिक कारणाने बंद असल्याचेही सांगण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी कल्याण दौºयावर येत असून त्यांच्या येण्याआधी ही समिती पाहणी करत आहे. त्यामुळे पाहणीला विशेष महत्त्व देण्यात आले होते. त्यामुळे अधिकारी, कर्मचाºयांनी या दौºयाबबत प्रचंड गोपनीयता बाळगली होती. महापौर विनिता राणेंसह महापालिका अधिकाºयांना या पाहणीबाबत विचारले असता त्यांनी माहिती नाही, असे उत्तर दिले.
शहरांत स्वच्छतेची झाडाझडती; स्वच्छता सर्वेक्षण समितीचे पथक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:30 PM